जसप्रीत बुमराहने गेल्या काही वर्षांत भारतीय संघाकडून खेळताना आश्वासक कामगिरी केली आहे. फार कमी कालावधीत बुमराहने मिळालेल्या संधीचं सोन करत भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून संघातलं आपलं स्थान पक्कं केलं. भन्नाट शैली आणि यॉर्कर चेंडू टाकण्याची कला यामुळे बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रसिद्ध आहे. मात्र पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरच्या मते…बुमराहची पाठदुखीची समस्या त्याला फारकाळ तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळू देणार नाही. बुमराहला भविष्यात कोणत्या सामन्यांमध्ये खेळायचं आणि कुठे विश्रांती घ्यायची याचा विचार करावा लागणार असल्याचं अख्तरने सांगितलं. तो आकाश चोप्राच्या यू-ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

“बुमराहची शैली वेगळी आहे, तो तिन्ही प्रकारचं क्रिकेट खेळू शकणार नाही. कसोटी क्रिकेटमध्येही त्याने गेल्या काही सामन्यांत चांगली कामगिरी केली आहे. तो खूप मेहनती आहे, आपल्याला कुठे जायचंय हे त्याला माहिती आहे. पण त्याची पाठदुखी त्याला साथ देईल का हा मोठा प्रश्न आहे. बुमराहची गोलंदाजीची शैली ही वेगळी असल्यामुळे गोलंदाजीदरम्यान त्याच्या पाठीवर ताण येतो. त्याची पाठ हा ताण कितीकाळ सहन करु शकेल हा महत्वाचा प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वी तो दुखापतग्रस्त झाला होता. मी त्याचे सामने पाहत असताना माझ्या मित्रांना नेहमी सांगतो की हा फारकाळ टिकणार नाही.” अख्तरने आपलं मत मांडलं.

दुखापतीनंतर जसप्रीत बुमराहने भारतीय संघात पुनरागमन केलं. २०२० वर्षात बुमराह न्यूझीलंडविरुद्ध दौऱ्यात खेळला, मात्र त्या मालिकेत बुमराहला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. यानंतर करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सर्व सामने बंद होते. या काळात सर्व भारतीय खेळाडू घरी बसून होते. यानंतर आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सर्व खेळाडू सज्ज झाले आहेत. बुमराह आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो.