धनंजय रिसोडकर, मुंबई

अ‍ॅथलेटिक्स

स्पर्धा अधिक तीव्र होत जाते, तेव्हा यशाचे अधिक झटपट आणि सोपे मार्ग शोधण्याचे प्रमाणदेखील मोठय़ा प्रमाणात वाढते. अ‍ॅथलेटिक्समधील सर्वच स्पर्धामध्ये तर शतांश सेकंद किंवा त्या शतांश सेकंदाचाही दशांश भाग अशा स्वरूपात निकाल येऊ लागल्याने तर सोपे मार्ग शोधण्याची चढाओढ अधिकच तीव्र झाली आहे. त्याला वेसण घालण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने मागील आठवडय़ात महिला स्पर्धकांतील ‘टेस्टोस्टेरॉन’नामक हार्मोन (संप्रेरक) प्रमाणाच्या नियमाला अधिकच कठोर करण्याचे ठरवले असून, येत्या नोव्हेंबरपासून ते नियम सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये लागू केले जाणार आहेत. या नवीन नियमाने स्त्रीत्वच्या नियमांची धार अधिक तेज केली जाणार असल्याने त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच राष्ट्रीय स्तरावरदेखील उमटू लागले आहेत. वरपांगी या प्रकरणात काही महिला खेळाडूंवर अन्याय होण्याची शक्यता दिसत असली तरी त्यापेक्षा कैकपटीने अधिक महिलांना न्याय मिळण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हणूनदेखील त्याकडे पाहिले जात आहे .

दक्षिण आफ्रिकेची महिला धावपटू कॅस्टर सेमेन्याने ८०० मीटर गटात दोन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक प्राप्त केल्यानंतर अनेक महिला धावपटूंनी हतबलता व्यक्त केली होती. तसेच काही अन्य स्पर्धामध्येदेखील टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण अधिक असलेल्या महिलांनी वर्चस्व गाजवण्याच्या प्रकारात वाढ होऊ लागली होती. त्या पाश्र्वभूमीवर टेस्टोस्टेरॉनच्या नवीन मानकानुसार त्याचे प्रमाण हे रक्तात १ लिटरमागे १० नॅनोमोलवरून ५ नॅनोमोलपर्यंत आणण्यात आले आहे. अ‍ॅथलेटिक्सच्या विविध प्रकारांसह एकूण ५५ क्रीडा प्रकारांतील महिलांसाठी हे नियम बंधनकारक करण्यात आले आहेत. ज्या महिला खेळाडूंच्या रक्तात ही पातळी अधिक असेल त्यांना नैसर्गिक हार्मोन थेरपी घेऊन ते प्रमाण कमी करावे लागेल किंवा पुरुषांच्या गटात उतरावे लागेल किंवा अखेरचा पर्याय म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा विचारच सोडून द्यावा लागेल, असे आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने नवीन नियमावलीत स्पष्ट केले आहे.

सामान्य प्रमाण

सामान्य महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण हे प्रतिलिटर रक्तामध्ये ०.१२ ते १.७९ नॅनोमोल इतके असते, तर पुरुषांमध्ये हे प्रमाण ७.७ ते २९.४  नॅनोमोल इतके असते. त्यामुळेच आधी महिलांसाठी हे प्रमाण प्रतिलिटर रक्तामागे १० नॅनोमोल इतके ठरवण्यात आले होते. मात्र त्यातही मखलाशी होऊन सामान्य महिला खेळाडूंवर अन्याय होत असल्याचे निदर्शनास आल्यानेच महासंघाने ते प्रमाण ५ नॅनोमोलपर्यंत घटवण्याचा निर्णय घेतला.

टेस्टोस्टेरॉन अधिक असण्याचा फायदा

ज्या महिलांच्या रक्तात प्रतिलिटर ५ ते १० नॅनोमोल टेस्टोस्टेरॉन आढळते, त्यांना स्नायूवजनात ४.४ टक्के, स्नायूपुष्टतेमध्ये १२ ते २६ टक्के, तर हिमोग्लोबीनच्या प्रमाणात ५ ते ७.८ टक्के वाढ होऊ शकते. या सर्व बाबींचा फायदा उठवत पुरुषी भासणाऱ्या महिला खेळाडू त्या स्पर्धामध्ये विजेतेपद पटकावत स्वत:चा फायदा करून घेण्याचे प्रमाण गेल्या दीड-दोन दशकांमध्ये अधिक प्रमाणात वाढले होते.

महासंघाच्या नवीन निर्णयामुळे खऱ्या अर्थाने ज्या महिला धावपटू आहेत, त्यांना न्याय मिळू शकणार असल्याने मी या निर्णयाचे निश्चितपणे स्वागत करते. गेल्या दीड-दोन दशकांपासून टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण अधिक असलेल्या महिला खेळाडूंचा स्पर्धेतील सहभाग आणि विजेतेपदाचे प्रमाण बऱ्यापैकी वाढले होते. त्याला या नवीन नियमामुळे वेळीच पायबंद बसू शकणार आहे. ज्यांच्यात टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण अधिक आहे, त्यांना महिला गटात स्थान दिल्याने खऱ्या महिला धावपटूंवर अन्याय व्हायचा. ज्यांना महिला गटातून स्पर्धक म्हणून उतरायचे आहे, त्यांनी स्वत: महिला असल्याचे शास्त्रीय चाचणीतून सिद्ध केले तरच त्यांना स्पर्धेत उतरू द्यावे. काही जणींवर त्यामुळे अन्याय होऊ शकतो. मात्र या निर्णयाचा फायदा ज्या प्रमाणात खऱ्या महिला खेळाडूंना होणार आहे, त्यापुढे ते प्रमाण नगण्य असल्याने सर्वानीच या नवीन नियमाचे स्वागत करावे, असे मला वाटते.

– पी. टी. उषा, भारताची माजी धावपटू व प्रशिक्षक

निसर्गाने प्रत्येकातच काही कमी-जास्त गुण-अवगुण दिलेले असतात. त्यातले शारीरिक स्तरावरचे काही मोजता येण्यासारखे असतात, तर मानसिक स्तरावरचे मोजता न येण्यासारखे असतात. कुणीच परिपूर्ण बनूून जन्माला येत नाही, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे आमच्यासारख्या काही खेळाडूंमध्ये जी अतिरिक्त संप्रेरके निसर्गाने दिली आहेत, ती आमच्या शरीराने आणि मनाने आम्ही स्वीकारली आहेत. आमच्यावरील अन्याय स्वीकारून आम्ही ज्याला कारकीर्द मानून त्यामागे धावत आहोत, त्या क्षेत्रात तरी आमच्यावर अन्याय केला जाऊ नये. २०१५ मध्ये मला याचा अनुभव आल्यावर मी लढा देऊन त्यातून यशस्वीपणे बाहेर आले. मात्र त्यात माझ्या कारकीर्दीची दोन महत्त्वाची वर्षे वाया गेली आहेत.

– द्युती चंद, भारतीय धावपटू

ज्या महिला धावपटूंमध्ये संप्रेरकांचे प्रमाण निसर्गत:च जास्त आहे, त्यांना ते नैसर्गिकपणे कमी करण्याचे निर्देश नवीन नियमानुसार देण्यात आले आहेत. त्याबाबत प्रामाणिक प्रयत्न करूनही जर ते कमी झाले नाहीत, तर हार्मोन थेरपीसारखे पर्याय हे शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा क्लेशकारक ठरू शकतात. अन्यथा पुरुषांविरुद्ध त्या खेळात उतरणे म्हणजे आत्मघातच करून घेण्यासारखे असल्याची कल्पना बहुतांश महिला खेळाडूंना असल्याने अशा स्वरूपाचे पर्याय नाकारून स्पर्धेतील सहभागच टाळण्याची शक्यता अधिक वाटते. तसेच अशा खेळाडूंना केवळ राष्ट्रीय स्पर्धेपुरतेच मर्यादित ठेवण्याचा नियमदेखील अन्यायकारक आहे.

– शांती सुंदरराजन, महिला धावपटू

सामान्य मुली वयात आल्यानंतर त्यांच्या रक्तातील टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमाल १.८४ नॅनोमोल प्रतिलिटपर्यंत वाढू शकते. काही कारणांमुळे लवकर पाळी थांबली किंवा काही अन्य कारणांमुळे जरी ते प्रमाण वाढले तरी ते प्रमाण प्रतिलिटर ५ नॅनोमोलपेक्षा अधिक वाढत नाही. त्यामुळे ज्या काही महिला खेळाडू टेस्टोस्टेरॉनचा उत्तेजक म्हणून उपयोग करीत असतील, त्यांचेच प्रमाण ५ नॅनोमोलपेक्षा अधिक वाढेल. त्यामुळे नवीन नियमावलीमुळे त्याचा उत्तेजक म्हणून वापरावर लगाम बसू शकेल, असे मला वाटते.

– डॉ. ज्ञानेश्वर चोपडे, जनुकीय तज्ज्ञ