भारत आणि पाकिस्तान यांच्यात १६ जूनला सामना होणार आहे. १४ फेब्रुवारीला पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी विश्वचषक स्पर्धेत खेळू नये असा सूर भारतीयांमध्ये दिसून आला. मात्र सर्व सामने नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच होतील, असे ICC ने स्पष्ट केल्यानंतर अखेर १६ जूनला हा सामना होणार आहे. या सामन्याबाबत अनेक क्रिकेट जाणकारांनी आपले मत व्यक्त केले आहे. तशातच क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही भारत-पाक सामन्याबाबत एक भविष्यवाणी केली आहे.

WC 2019 : भारताला हरवायचं असेल तर ‘हे’ कराच!; वकारचा पाकला कानमंत्र

“गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण .. तीनही आघाड्यांवर भारतीय संघ चांगला आहे. भारतीय संघ जेव्हा उत्तम लयीत असतो तेव्हा त्यांना पराभूत करणे अत्यंत कठीण असते. रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही भारतीय संघ उत्तम लयीत असेल असा मला विश्वास आहे.”, असे सचिन म्हणाला. भारताचे या विश्वचषक स्पर्धेत ३ सामन्यात ५ गुण आहेत. पहिल्या सामन्यात भारताने आफ्रिकेला पराभूत केले, तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. तिसरा सामना मात्र (न्यूझीलंडविरुद्धचा) पावसामुळे रद्द झाला.

(प्रातिनिधिक फोटो)

 

पाकिस्तानच्या यंदाच्या विश्वचषकातील कामगिरीवरही सचिनने भाष्य केले. “मी पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना पाहिला. या सामन्यात मला पाकिस्तानच्या खेळातील एक बाब प्रकर्षाने जाणवली. फलंदाजी करताना त्यांच्यात भागीदारी होते, पण नेमके महत्वाच्या वेळीच ते गडी गमावतात. त्यामुळे प्रत्येक सामन्यात खेळताना पक्षितांच्या डोक्यात ही गोष्ट नक्की असणार की सामना चांगला सुरु असला, तरी आपल्याला गडी बाद होऊ द्यायचे नाहीत आणि या गोष्टीचे कुठेतरी दडपण पाकिस्तानवर दिसून येऊ शकते. भारतीय संघ मात्र मोक्याच्या क्षणी गडी गमावण्याची चूक करण्याची शक्यता खूपच कमी आहे. हाच दोन संघांमधील फरक आहे,” असे सचिन म्हणाला.