विश्वचषक स्पर्धेत शनिवारी अखरेच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अफगाणिस्तानची कडवी झुंज मोडून काढत पाकिस्तानने अखेर बाजी मारली. लीड्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानवर ३ गडी राखून मात केली. २२८ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला अखेरच्या षटकात विजयासाठी ६ धावांची गरज होती. इमाद वासिम आणि वहाब रियाज जोडीने या धावा पूर्ण करत पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान अजूनही जिवंत आहे.

पाकिस्तानने हा विजय मिळवून चौथ्या स्थानी झेप घेतली. पाकिस्तानला आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी १ विजय आवश्यक आहे. पण त्या बरोबरच इंग्लडचा भारताविरुद्धच्या सामन्यात पराभव होणे हेदेखील पाकिस्तानला महत्वाचे आहे. त्यामुळे भारत – इंग्लंड सामन्यात भारताचे कट्टर विरोधी असलेले पाकिस्तानचे चाहते भारताला पाठिंबा देत असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानेही पूर्ण पाकिस्तान टीम इंडियासोबत आहे, असे स्पष्ट केले आहे.

एका व्हिडिओमध्ये बोलताना शोएब म्हणाला की संपूर्ण पाकिस्तान आज टीम इंडियाच्या पाठीशी उभं आहे. मी विनंती करतो की इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या पाकिस्तानी चाहत्यांनी देखील टीम इंडियाला पाठिंबा द्यावा. कारण जर आज भारताने इंग्लंडला पराभूत केले, तर त्याचे आव्हान संपुष्टात येईल. त्यानंतर पाकिस्तानला केवळ एकच सामना जिंकता येईल.

दरम्यान, २२८ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानी संघाची सुरुवात खराब झालेली आहे. विश्वचषक स्पर्धेत आपलं आव्हान कायम राखण्यासाठी विजय आवश्यक असलेला पाकिस्तानचा संघ अफगाणिस्तानविरोधात संकटात सापडलेला आहे. मोहम्मद नबी आणि मुजीब उर रेहमान यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर पाकिस्तानचे ३ फलंदाज माघारी परतले आहेत. सलामीवीर फखार झमानला मुजीबने पहिल्याच षटकात माघारी धाडत पाकिस्तानला धक्का दिला. यानंतर इमाम उल-हक आणि बाबर आझम यांनी छोटेखानी अर्धशतकी भागीदारी रचत पाकिस्तानचा डाव सावरला. मोहम्मद हाफीज आणि हॅरिस सोहेल यांच्यातही भागीदारी रचण्याचा प्रयत्न झाला, पण मुजीबने त्याला माघारी धाडत पाकला धक्का दिला.

पाकिस्तानचा संघ संकटात सापडलेला असतानाच इमाद वासिम आणि शादाब खान यांनी झटपट धावा काढत अर्धशतकी भागीदारीची नोंद केली. अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीन नैबच्या गोलंदाजीवर पाकिस्तानने खोऱ्याने धावा काढत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र चोरटी धाव काढण्याच्या प्रयत्नात शादाब खान धावचीत होऊन माघारी परतला. मात्र तळातल्या फलंदाजांनी संयमी फलंदाजी करत पाकच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अफगाणिस्तानकडून मुजीब उर-रेहमान आणि मोहम्मद नबीने प्रत्येकी २-२ बळी घेतले. राशिद खानने १ बळी घेतला.

त्याआधी, शाहीन आफ्रिदी-इमाद वासिम यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर पाकिस्तानने अफगाणिस्तानला २२७ धावांवर रोखण्यात यश मिळवलं आहे. उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी पाकिस्तानला या सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे. त्यामुळे अफगाणिस्तानने दिलेलं आव्हान पाकिस्तानी फलंदाज कसं पूर्ण करतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पाकिस्तानकडून शाहीन आणि इमाद यांनी अफगाणिस्तानच्या डावाला खिंडार पाडलं. अफगाणिस्तानकडून असगर अफगाण, नजिबउल्ला झरदान यांनी थोडीफार झुंज दिली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने ४, इमाद वासिम आणि वहाब रियाझने २ तर शादाब खानने १ बळी घेतला.