भारतीय संघातील सलामीवीर शिखर धवन याला दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर व्हावे लागले. त्याच्या जागी ऋषभ पंत याला संघात स्थान देण्यासाठी BCCI ने ICC ला विनंती केली आहे. या दरम्यान आता अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याला दुखापत झाल्याचे समजते आहे. सराव सत्र दरम्यान त्याच्या पायाच्या बोटाला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बुधवारी भारतीय संघाने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी सराव केला. या सराव सत्रात पावसामुळे काही काळ व्यत्यय आला होता. पण जितका वेळ सराव स्तर चालले त्या वेळात भारतासाठी एक धक्कादायक घटना घडली. जसप्रीत बुमराह याच्या गोलंदाजीवर सराव करताना अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याच्या पायाच्या बोटाला चेंडू लागला. बुमराहच्या यॉर्कर चेंडूवर शंकरला पायाचा बचाव करता आला नाही आणि चेंडू पायाच्या बोटाला लागून तो दुखापतग्रस्त झाला.

विजय शंकरच्या पायाला दुखापत झालेली असली तरीही त्यामध्ये काळजी करण्याएवढे काहीही नाही. दुखापत फारशी गंभीर नाही. दुखापतीतून तो लवकरच तंदुरुस्त होऊ शकतो, असे पीटीआयला मिळालेल्या माहितीनुसार सांगण्यात येत आहे. विजय शंकरला सलामीवीर शिखर धवन याच्या दुखापतीनंतर संघात स्थान देण्यात आले. राहुलला सलामीला खेळावे लागल्यानंतर सध्या भारताकडे चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी विजय शंकर हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे बोलले जाते. पाकिस्तानविरुद्ध विजय शंकर याने चांगली कामगिरी केली. विश्वचषक स्पर्धेच्या आपल्या पहिल्याच चेंडूवर त्याने गडी माघारी धाडला.