ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि विराट कोहली यांच्यामध्ये कसोटी क्रमावरीतील नंबर वनच्या शर्यतीत भारताच्या विराट कोहलीनं बाजी मारली आहे. विराट कोहलीनं ९२८ अंकासह अव्वलस्थानी पुन्हा एकदा झेप घेतली आहे. स्मिथ ९२३ अंकासह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. पाकिस्तानविरोधात नुकत्याच झालेल्या मालिकेतील खराब कामगिरीचा फटका स्मिथला बसला. दुसरीकडे, कोहलीने बांग्लादेशविरूद्ध चांगली कामगिरी बजावत आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अनेक गुणांचा फायदा करून घेत अव्वल स्थान मिळवले आहे.

नुकतेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, वेस्ट इंडिज विरुद्ध अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका संपल्या. या मालिकेनंतर आज आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली. पहिल्या दहा फलंदाजांमध्ये भारताचा विराट कोहली व्यतिरिक्त चेतेश्वर पुजारा चौथ्या क्रमांकावर आणि अजिंक्य रहाणे सहाव्या क्रमांकावर आहेत. अजिंक्य रहाणेला एका स्थानाचा फटका बसला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन ८७७ गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे. पाकिस्तानविरुद्ध अ‍ॅडिलेडमध्ये झालेल्या डे-नाईट कसोटी सामन्यात नाबाद तिहेरी शतकी खेळी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला १२ गुणांचा फायदा झाला. वॉर्नरने कसोटी क्रमवारी मोठी झेप घेत पाचव्या स्थानी विराजमान झाला.

फलंदाजाचे नाव  अंक

विराट कोहली      ९२८
स्टिव स्मिथ           ९२३
केन विल्यमसन      ८७७
चेतेश्वर पुजारा         ७९१ 
डेव्हिड वॉर्नर           ७६४
अजिंक्य रहाणे         ७५९
ज्यो रूट                  ७५२
मार्नस लॅब्यूशाने       ७३१
हेन्री निकोलस          ७२६

गोलंदाजांच्या यादीत भारताच्या मोहम्मद शामीनं टॉप टेनमध्ये प्रवेश केला आहे. ७७१ अंकासह शामी दहाव्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्सने अव्वल स्थान कायम राखलं आहे. अव्वल दहा गोलंदाजामध्ये भारताचे तीन गोलंदाज आहे. बुमराह पाचव्या स्थानावर तर आर अश्वन नवव्या स्थानावर विराजमान आहे. विंडिजच्या जेसन होल्डरला एका स्थानाचा फायदा झाला असून तो तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे.