उपांत्य फेरीच्या मार्गात आज ऑस्ट्रेलियाचा अडथळा

लागोपाठ चार सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचा विजयरथ दक्षिण आफ्रिकेने रोखला होता. महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथे बुधवारी होणाऱ्या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य असेल.

भारतीय संघाने इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान व श्रीलंका यांच्यावर मात करताना गोलंदाजी व फलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. मात्र आफ्रिकेविरुद्ध त्यांना ११५ धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियानेही पहिले चार सामने जिंकले. मात्र पाचव्या सामन्यात त्यांना इंग्लंडने तीन धावांनी पराभवाचा धक्का दिला. साखळी गटात भारतापेक्षा ऑस्ट्रेलियाची धावगती चांगली आहे. भारताला शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडसारख्या बलाढय़ संघाशी खेळावे लागणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिाविरुद्ध विजय मिळवल्यास भारतीय संघासाठी उपांत्य फेरीचे दरवाजे खुले होऊ शकतील.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची आजपर्यंतची कामगिरी फारशी आशादायक नाही. भारताला ४१ सामन्यांपैकी केवळ आठ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला मिताली राजच्या शानदार ८९ धावांमुळे पाच विकेट्स राखून विजय मिळवता आला होता. भारताची मुख्य मदार स्मृती मंधाना, पूनम राऊत, दीप्ती शर्मा व मिताली यांच्यावर असेल.

प्रतिस्पर्धी संघ

  • भारत : मिताली राज (कर्णधार), एकता बिश्त, राजेश्वरी गायकवाड, झुलान गोस्वामी, मानसी जोशी, हरमानप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती, स्मृती मंधाना, मोना मेश्राम, शिखा पांडे, पूनम यादव, नुझत परवीन, पूनम राऊत, दीप्ती शर्मा, सुषमा वर्मा.
  • ऑस्ट्रेलिया : मेग लॅनिंग (कर्णधार), सराह अ‍ॅली, कर्स्टन बीम्स, अ‍ॅलेक्स ब्लॅकवेल, निकोली बोल्टन, अ‍ॅशलीघ गार्डनर, रॅचेल हेन्स, अ‍ॅलिसा हिली, जेस जोनासन, बेथ मुनी. एलिसी पेरी, मिगन शूट, बेलिंडा वाकेरेवा, एलिसी विलानी, अमांडा जेन वेलिंग्टन.
  • सामन्याची वेळ : दुपारी ३ वाजल्यापासून
  • प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनी.