विश्वचषकातील सामन्यांमध्ये बुमराहने उत्तम गोलंदाजी करत सर्वांची वाहवा मिळवली होती. अशातच न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज गोलंदाज डॅनिअल व्हिटोरी यानंदेखील बुमराहबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. बुमराहच्या भेदक माऱ्याचा सामना करणं न्यूझीलंडच्या फलंदांचासाठी कठीण असल्याचं मत व्हिटोरी यानं व्यक्त केलं. उपांत्य फेरीतील सामन्यापूर्वी विट्टोरीने न्यूझीलंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांपासून सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
मॅन्चेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेड ग्राऊंडवर भारत विरूद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे कोणत्याही फलंदाजाच टिकू शकणार नाही, असं मत व्हिटोरीनं भारत न्यूझीलंड सामन्यापूर्वी व्यक्त केलं आहे. मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी न्यूझीलंडनं भारत विरूद्ध इंग्लंड या सामन्यातून धडा घ्यालया हवा. इंग्लंडविरूद्धच्या सामन्यातही बुमराहनं उत्तम गोलंदाजी केली होती. अशा परिस्थितीत बुमराच्या भेदक माऱ्याचा सामना करण्याचं आव्हान न्यूझीलंडच्या फलंदाजांसमोर असेल, असंही तो म्हणाला.
यावेळी व्हिटोरीनं इंग्लंडविरूद्ध भारत सामन्याचा उल्लेख करत इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांविरूद्ध केलेल्या फलंदाजीचं उदाहरण दिलं. इंग्लंडच्या सर्वच फलंदाजांनी भारताच्या सर्वच फिरकीपटूंविरोधात उत्तम फलंदाजी केली होती. हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शमी यांच्याविरोधातही त्यांनी उत्तम फलंदाजी केली होती. त्यामुळे व्हिटोरीनं न्यूझीलंडच्या फलंदाजांना भारताविरोधात आक्रमक खेळी करण्याचा सल्ला दिला. तसंच लवकरत लवकर भारताच्या सुरूवातीच्या फलंदांना बाद करून मधल्या फळीतील फलंदाजांवर दबाव टाकला पाहिजे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या विकेट महत्त्वाच्या असून त्यांनी सुरूवातील धीम्या गतीने धावा केल्या तर ते पुढं मोठी धावसंख्या उभी करतील, असंही तो यावेळी म्हणाला.