ENG vs WI 1st Test : करोनाने ठप्प असलेले आतंरराष्ट्रीय क्रिकेट अखेर इंग्लंडमध्ये सुरू झाले. वेस्ट इंडिजने पहिल्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी यजमानांवर ४ गडी राखून विजय मिळवला. २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ब्लॅकवूडने धडाकेबाज ९५ धावांची खेळी केली. या विजयासह वेस्ट इंडिजने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ची आघाडी घेतली. पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ५ बळी टिपणाऱ्या गॅब्रियलला सामनावीराचा किताब मिळाला.

ICC ने आयोजित केलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत वेस्ट इंडिजने आपला विजय कसोटी विजय नोंदवला. त्यामुळे ४० गुणांसह त्यांनी गुणतालिकेत आपले खाते उघडले. या स्पर्धेअंतर्गत खेळवण्यात आलेल्या प्रत्येक कसोटी मालिकेला १२० गुण दिले आहेत. सामन्यांच्या संख्येनुसार ते गुण विभागले जातात. वेस्ट इंडिज-इंग्लंड कसोटी मालिका ३ सामन्यांची असल्याने १ सामना जिंकल्यावर वेस्ट इंडिजला ४० गुण मिळाले. दक्षिण आफ्रिकेचे २४ गुण असल्याने वेस्ट इंडिजने त्यांना ‘ओव्हरटेक’ केलं आहे. भारत या गुणतालिकेत ३६० गुणांसह अव्वल आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया (२९६) आणि तिसऱ्या स्थानी न्यूझीलंड (१८०) आहे.

पाहा गुणतक्ता

वेस्ट इंडिजचा इंग्लंडला दणका

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी पहिल्या डावात २०४ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव ३१८ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे वेस्ट इंडिजकडे पहिल्या डावाअखेरीस शतकी आघाडी होती. त्यानंतर इंग्लडंच्या दुसऱ्या डावात सिबलीने (५०) अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर क्राव्हलीने डाव सांभाळत स्टोक्सला साथ दिली आणि ९८ धावांची भागीदारी केली. क्राव्हलीने ७६ तर स्टोक्सने ४६ धावा केल्या. पण इतर फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे इंग्लंडला ३१३ धावाच करता आल्या.

शेवटच्या दिवशी २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने झटपट तीन गडी गमावले. जॉन कॅम्पबेलही एका धावेवर खेळत असताना रिटायर्ड होत तंबूत परतला. पण त्यानंतर रॉस्टन चेस आणि जेरमाईन ब्लॅकवूड या दोघांनी दमदार खेळी केली. त्यांनी ७३ धावांची भागीदारी केली. ब्लॅकवूड ९५ धावांवर बाद झाल्यावर कर्णधार होल्डरने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.