रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं विजेतेपद मिळवलं. यानंतर माजी खेळाडू आणि क्रिकेट चाहत्यांमध्ये भारतीय टी-२० संघाचं कर्णधारपद आता रोहितकडे सोपवण्यात यावं अशी चर्चा सुरु झाली आहे. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनेही याप्रकरणात इतर खेळाडूंची री ओढली असून…विराटच्या अनुपस्थितीत रोहितने ऑस्ट्रेलियात स्वतःला सिद्ध केल्यास आगामी काळात Split Captaincy (कर्णधारपद विभाजन) चा मुद्दा अजून चर्चेला येईल.

“कसोटीत सलामीवीर म्हणून रोहितची कदाचीत ही पहिलीच मालिका असावी. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यासारख्या खेळाडूंच्या समोर त्याचा कस लागणार आहे. कर्णधार म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची रोहितकडे चांगली संधी आहे. त्याने या संधीचा फायदा घेतला पाहिजे. त्याच्यात संघाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. जर रोहितने ऑस्ट्रेलियात स्वतःला सिद्ध केलं तर स्पिल्ट कॅप्टन्सीची चर्चा अजून जोर धरेल.” पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अख्तर बोलत होता.

अवश्य वाचा – विराटच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता, त्याने कर्णधारपद रोहितकडे सोपवण्याचा विचार करावा !

२७ नोव्हेंबरपासून भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार असून या मालिकेत दोन्ही संघ ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहेत. कर्णधार विराट कोहली पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर आपली पत्नी अनुष्काची बाळतंपणात काळजी घेण्यासाठी भारतात परतणार आहे. या काळात विराटच्या जागी रोहितची भारतीय कसोटी संघात निवड करण्यात आली आहे.