मेलबर्न येथे सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पहिल्या डावांत ऑस्ट्रेलियाचा संघ १९५ धावांपर्यंत मजल मारु शकला. भारतीय संघाकडून बुमराह, अश्विन आणि सिराज यांनी भेदक मारा केला. भारतीय गोलंदाजासमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. अश्विननं तीन बळी घेत कांगारुंना सळो की पळो करु सोडलं. अश्विननं आपल्या दुसऱ्याच षटकांत तुफान फॉर्मात असलेल्या मॅथ्यू वेडला बाद केलं. त्यानंतर स्मिथलाही माघारी झाडलं. ६५ व्या षटकांत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनला अश्विननं बाद केलं. मेलबर्नच्या मैदानावर तीन विकेट घेताच अश्विननं कोच रवी शास्त्री यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

रवी शास्त्री यांनी १९८५-८६ मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मेलबर्न कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी चार बळी घेतले होते. त्यानंतर मेलबर्न क्रिकेट मैदानावर आतापर्यंत एकाही फिंगर स्पिनरला तीन किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेता आल्या नव्हत्या. पण अश्विननं दुसऱ्या कसोटी सामन्यात तीन बळी घेत शास्त्रींच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर पहिल्या दिवशी तीन किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारा अश्विन दुसरा फिंगर स्पिनर आहे.

अनिल कुंबळेलाही टाकलं मागे –

अश्विनने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एका कसोटी सामन्यात तीन किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याचा कारनामा आठव्यांदा करत पहिल्या स्थानावर पोहचला आहे. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या कुंबळेनं हा कारनामा सात वेळा केला आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या बिशन सिंह बेदी आणि इरापल्ली प्रसन्ना यांनी हा कारनामा प्रत्येकी सहा-सहा वेळा केला आहे.