मेलबर्न कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसाच्या खेळात पहिल्या सत्रामध्ये भारतीय संघाला चांगली टक्कर दिली आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर संपुष्टात आणल्यानंतर भारतीय संघाने पहिल्या दिवसाअखेरीस १ विकेटच्या मोबदल्यात ३६ धावांपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या दिवशी युवा शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी सावध सुरुवात केली. परंतू कमिन्सने मोक्याच्या क्षणी दोन बळी घेत भारताला धक्के दिले. पहिल्या सत्राअखेरीस भारताने ३ गडी बाद ९० पर्यंत मजल मारली.

गिल आणि पुजाराने कांगारुंच्या माऱ्याचा सावधपणे सामना केला. या दोघांची जोडी जमतेय असं वाटत असतानाच शुबमन गिल कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या गिलने ६५ चेंडूत ८ चौकारांसह ४५ धावा केल्या. यानंतर ठराविक अंतराने चेतेश्वर पुजाराही कमिन्सच्या गोलंदाजीवर १७ धावा काढून माघारी परतला.

दोन बिनीचे शिलेदार माघारी परतल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी मैदानात येत भारताचा डाव सावरला. फारशी जोखीम न स्विकारता दोन्ही फलंदाजांनी धावफलक हलता ठेवत भारतीय संघाची अधिक पडझड होऊ दिली नाही.