ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी सामन्यात भारतीय संघाने चहापानाच्या सत्रावरही आपलं वर्चस्व गाजवलं आहे. दुसऱ्या सत्रात महत्वाचे दोन बळी घेत भारताने ऑस्ट्रेलियाला चहापानापर्यंत १३६/५ अशा परिस्थितीवर आणून सोडलं. जसप्रीत बुमराह, आश्विन आणि सिराज यांनी भेदक मारा करत दुसरं सत्र गाजवलं.

अवश्य वाचा – Video : ‘सर जाडेजा’ चमकले, गिलसोबत टक्कर होऊनही घेतला सुरेख झेल

पहिल्या सत्राअखेरीस कांगारुंचा संघ ६५ धावांपर्यंत मजल मारु शकला. यानंतर दुसऱ्या सत्रात लाबुशेन आणि ट्रॅविस हेड जोडीने चांगली सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत चौथ्या विकेटसाठी ८६ धावांची भागादीरी केली. ही जोडी मैदानावर जम बसवतेय असं वाटत असतानाच अजिंक्य रहाणेने पुन्हा एकदा बुमराहला संधी दिली, बुमराहनेही आपल्या लौकिकाला साजेसा मारा करत ट्रॅविस हेडला रहाणेकरवी झेलबाद केलं. हेड ३८ धावा करुन माघारी परतला.

यानंतर पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या मोहम्मद सिराजनेही मैदानावर स्थिरावलेल्या लाबुशेनला माघारी धाडलं. शुबमन गिलने लाबुशेनचा सुरेख झेल घेतला. लाबुशेनने ४८ धावांची खेळी केली. त्यामुळे कांगारुंच्या उर्वरित संघाला माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – बॉक्सिंग डे कसोटीत स्टिव्ह स्मिथवर नामुष्की, आश्विनने जाळ्यात अडकवलं