भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा सामना दिल्लीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका सध्या २-२ अशी बरोबरीत आहे. पहिले दोन सामने भारताने जिंकले आहेत, तर दुसरे सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने जिंकून मालिकेत दमदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे पाचवा सामना हा अतिशय महत्वाचा आणि निर्णायक आहे. मात्र या सामन्याला ऑस्ट्रेलियाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू मुकण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाकडून यंदाचा सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात आलेला खेळाडू मार्कस स्टॉयनिस हा पाचव्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. भारताविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे मार्कस स्टॉयनिस हा जायबंदी झाला होता. त्यामुळे चौथ्या सामन्याला त्याला मुकावे लागले होते. पण पाचव्या सामन्यापर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकेल अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. पण तो अद्याप तंदुरुस्त न झाल्यामुळे पाचव्या सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चौथ्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्टॉयनिसबाबत बोलताना पीटर हॅंड्सकॉम्ब म्हणाला की तो पाचव्या सामन्यात खेळू शकेल असे वाटत होते, पण त्याच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला बॅट पकडणेदेखील काहीसे अवघड जात आहे. तो तंदुरुस्त होण्याची आम्ही वाट पहात आहोत.

दरम्यान, चौथ्या सामन्यात स्टॉयनिसच्या जागी टर्नर याला संधी देण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे टर्नरने त्या सामन्यात झंझावाती खेळी केली. त्याने ४३ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ८४ धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतावर ५ गडी राखून विजय मिळवला. याशिवाय पीटर हॅंड्सकॉम्बने संघर्षपूर्ण शतक ठोकले. त्याने १०५ चेंडूत ११७ धावा केल्या. यात ८ चौकार आणि ३ षटकार समाविष्ट होते. तसेच ख्वाजानेही ९९ चेंडूत ९१ धावांची उपयुक्त खेळी केली.