चुरशीच्या झालेल्या अॅडलेड कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी मात केली आणि ऐतिहासिक विजयाची नोंद केली. या विजयासह भारतीय संघाने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे, मात्र ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांमधून वेगळ्याच प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. भारताच्या विजयानंतर ऑस्ट्रेलियातील स्पोर्ट्स चॅनल फॉक्स क्रिकेटने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला, त्यामुळे नव्या वादाला सुरूवात झाली.  व्हिडीओ ट्विट करताच भारतीय चाहत्यांनी फॉक्स क्रिकेटला जबरदस्त ट्रोल केलं.


भारताकडून रविचंद्रन अश्विनने जोश हेझलवुडला बाद करत ऑस्ट्रेलियाला अखेरचा धक्का दिला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. हेझलवुडच्या बॅटची कडा घेतलेला चेंडू दुसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या के एल राहुलने झेलला. हाच अखेरच्या विकेटचा व्हिडीओ फॉक्स क्रिकेटने ट्विट केला. या व्हिडीओमध्ये कॅच घेताना बॉल राहुलच्या हातातून निसटताना दिसतोय, पण त्याने सहजपणे कॅच घेतल्याचंही दिसतंय. मात्र, हा कॅच व्यवस्थितपणे घेतला होता काय अशा आशयाचं ट्विट फॉक्स क्रिकेटने केलं आणि वादाला तोंड फोडलं. त्यांनी हे ट्विट करताच सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांनी फॉक्स क्रिकेटची चांगलीच खरडपट्टी काढत त्यांना जबरदस्त ट्रोल केलं. अनेकांनी आता तुम्हीही पाकिस्तान आणि बांगलादेशप्रमाणे पराभवानंतर कारणं शोधायला लागले काय असं म्हटलं. तर काहींनी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने काही वर्षांपूर्वी घेतलेल्या वादग्रस्त कॅचची आठवण करुन दिली आणि त्यापेक्षा तर राहुलने घेतलेला कॅच नक्कीच क्लिन होता असं म्हटलं.