पर्थ कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या कसोटीत विराट कोहली त्याच्या मैदानातील आक्रमक स्वभावामुळे चर्चेचा विषय बनला. ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनसोबत मैदानात झालेल्या द्वंद्वानंतर अनेक माजी खेळाडूंनी विराटवर टीकेची झोड उठवली. मात्र भारताचा माजी जलदगती गोलंदाज झहीर खान विराटच्या मदतीसाठी धावून आला आहे. लोकं काय विचार करतात याकडे लक्ष न देता विराटने आपल्यातली आक्रमकता टिकवून ठेवावी असं मत झहीर खानने व्यक्त केलं आहे.

“विराट ज्या गोष्टीमध्ये माहीर आहे ती गोष्ट त्याने कायम टिकवून ठेवावी. ज्या गोष्टीमुळे आज त्याला इतक यश मिळालंय ती कायम राखायलाच हवी, तिला सोडून देणं योग्य ठरणार नाही. इतर लोकं विराटबद्दल काय म्हणतायत याकडे लक्ष देण्यात अर्थ नाही. परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका नेहमी अशाच रंगतदार होत असतात.” झहीर पीटीआयशी बोलत होता.

अवश्य वाचा – विराटसारखे खेळाडू संघात असणं गरजेचं, अॅलन बॉर्डर यांच्याकडून भारतीय कर्णधाराचं कौतुक

झहीर खानसोबत ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू अॅलन बॉर्डर यांनीही विराट कोहलीच्या वागण्याचं समर्थन केलं आहे. विराटसारख्या खेळाडूंनी कोणत्याही संघात गरज असते असं म्हणत बॉर्डर यांनी कोहलीचं आक्रमक वागणं ही मोठी समस्या नसल्याचं म्हटलंय. ४ कसोटी सामन्यांची मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत आहे. २६ डिसेंबरला मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारतंय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.