भारतीय संघाने इंदूर कसोटी सामन्यापाठोपाठ कोलकाता कसोटीतही डावाने विजय मिळवत मालिकेत बाजी मारली. १ डाव आणि ४६ धावांनी भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात बाजी मारली. फलंदाजांप्रमाणेच भारतीय जलदगती गोलंदाजांनी धडाकेबाज कामगिरी केली. इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी या त्रिकुटाने बांगलादेशी गोलंदाजांचं कंबरडं मोडलं. या मालिकेत भारतीय गोलंदाजांनी केलेली कामगिरी पाहता आपल्याला याची जाणीव होईल.

दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात इशांत शर्माने बांगलादेशचा निम्मा संघ गारद केला होता, तर दुसऱ्या डावात उमेश यादवने ५ बळी घेतले. मालिकेत भेदक मारा करणाऱ्या इशांत शर्माला सामनावीर आणि मालिकावीराच्या किताबाने गौरवण्यात आलं.

अवश्य वाचा – टीम इंडियाकडून बांगलादेशी वाघांची शिकार, मालिकेतही मारली बाजी

कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा हा सलग सातवा विजय ठरला आहे. याचसोबत कसोटीत सलग ४ सामने डावाने जिंकण्याचा मानही भारतीय संघाला मिळाला आहे. याआधी २०१३ साली भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये सलग ६ विजयांची नोंद केली होती. २०१९ वर्षातला भारतीय संघाचा हा अखेरचा कसोटी सामना होता. यानंतर भारतीय संघाला घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादीत षटकांच्या क्रिकेट मालिकेला सामोरं जावं लागणार आहे.

अवश्य वाचा – टीम इंडियाची कसोटी क्रिकेटमध्ये ‘सत्ते पे सत्ता’