भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांवर आटोपला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत भारताने ३ बाद ३०३ धावांपर्यंत मजल मारली. १ बाद ८६ या धावसंख्येवरून आज भारताने डावाला सुरूवात केली. मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा दोघांनी आपली अर्धशतके पूर्ण केली. पण त्यानंतर पुजारा ५४ धावांवर बाद झाला. पाठोपाठ विराटही शून्यावर माघारी परतला. पण रहाणेच्या साथीने अग्रवालने डाव सावरला. अग्रवालने दमदार दीडशतक ठोकले, तर रहाणेने शानदार अर्धशतक लगावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामन्यात १४० धावांवर खेळत असताना मयंकने एक उत्तुंग षटकार लगावला. मेहिदी हसन मिराजने टाकलेला चेंडू मयंकने पुढे येऊन टोलवला. तो षटकार इतका उत्तुंग होता की चेंडू स्टेडिअमच्या छतावर जाणार असे वाटत होते. पण चेंडू छतावर न जाता थेट प्रेक्षकांच्यात पडला. त्यानंतर लगेचच त्याने भरभर धावा जमवत दीडशतक ठोकले.

हा पहा व्हिडीओ –

दरम्यान, पहिल्या दिवशी भारताच्या डावात सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. चेतेश्वर पुजारा आणि मयंक अग्रवाल या दोघांनी दमदार खेळी केली. या दोघांनी ९१ धावांची भागीदारी केली.

त्याआधी, बांगलादेशच्या पहिल्या डावात शदमन इस्लाम, इमरूल कयास आणि मोहम्मद मिथून हे तिघेही स्वस्तात बाद झाले. पण दुसऱ्या सत्रात बांगलादेशकडून चांगली झुंज पहायला मिळाली. कर्णधार मोमिनुल हक आणि अनुभवी मुश्फिकूर रहीम या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदीरी केली. अखेर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने ही जोडी फोडली. मोमिनुलने चेंडू न खेळण्याचा निर्णय घेतला पण चेंडू थेट स्टंपवर जाऊन आदळला. त्यामुळे ८ चौकारांसह ८० चेंडूत ३७ धावा करून मोमिनुल बाद झाला. मोमिनुलने ८ चौकारांसह ८० चेंडूत ३७ धावा केल्या. त्यानंतर अनुभवी मुश्फिकूर रहीम शमीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने १०५ चेंडूत ४३ धावा केल्या, पण बाकी फलंदाजांना खेळपट्टीवर दीर्घ काळ तग धरता आलं नाही. लिटन दासने २१ धावा करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही बांगलादेशचा डाव १५० धावांत आटोपला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban india vs bangladesh team india batsman mayank agarwal hit massive six video vjb
First published on: 15-11-2019 at 15:31 IST