भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर होणार आहे. पहिल्या सामन्यात ६६ धावांनी विजय मिळवून टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण, पहिल्या सामन्यात भारताचा मधल्या फळीचा फलंदाज श्रेयस अय्यर जायबंदी झाला आणि दुखापतीमुळे त्याला मालिकेबाहेर जावं लागलं.

आता दुसऱ्या वनडेमध्ये श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत टीम इंडियात एका नवीन खेळाडूला जागा मिळू शकते. इंग्लंडविरुद्ध ट्वेन्टी-२० क्रिकेट कारकीर्दीला झोकात प्रारंभ करणाऱ्या सूर्यकुमार यादवला दुसऱ्या वनडेत पदार्पणाची संधी मिळू शकते. ३६० अंशांमध्ये फटकेबाजी करण्याची क्षमता असलेला सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर अय्यरची जागा घेऊ शकतो. पण कर्णधार कोहली आणि संघव्यवस्थापनाकडे ऋषभ पंतचाही पर्याय आहे. ऋषभ पंत हा देखील इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी आणि टी-२० मालिकेत भन्नाट फॉर्ममध्ये होता. त्यामुळे आता सूर्यकुमार आणि पंत यांच्यापैकी कोणाला संधी मिळते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. सलामीवीर रोहित शर्माच्या कोपराला दुखापत झाली असली तरी तो दुसऱ्या सामन्यासाठी तंदुरुस्त असेल, असे सांगण्यात येत आहे. रोहितला विश्रांती दिल्यास शुबमन गिल याला संधी मिळू शकेल, तर के. एल. राहुल मधल्या फळीत फलंदाजीला उतरेल. एकदिवसीय मालिकेसाठी राहुलकडेच यष्टिरक्षणाची जबाबदारी राहील, तर ऋषभ पंतचा फलंदाज म्हणून मधल्या फळीसाठी विचार होऊ शकेल.

कुलदीपऐवजी चहल?
पहिल्या सामन्यात ‘चायनामन’ गोलंदाज कुलदीप यादव महागडा ठरला. त्याने नऊ षटकांत ६८ धावा दिल्या. त्यामुळे कुलदीपच्या जागी लेग-स्पिनर यजुवेंद्र चहलचा संघात समावेश होऊ शकतो. भुवनेश्वर कुमार, कृष्णा आणि शार्दूल ठाकूर या वेगवान त्रिकुटाने १० पैकी ९ बळी मिळवत इंग्लंडच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. त्यामुळे टी. नटराजन किंवा मोहम्मद सिराज यांना संधीसाठी प्रतीक्षाच करावी लागेल असं दिसतंय.

दुसरीकडे, मालिकेत बरोबरी साधून आव्हान जिवंत राखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या इंग्लंडलाही धक्का बसला आहे. कर्णधार ईऑन मॉर्गनने दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून माघार घेतली आहे, तर फलंदाज सॅम बिलिंग्सही दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यासाठी अनुपलब्ध असेल. परंतु तिसऱ्या सामन्यात त्याच्या खेळण्याची आशा आहे. मॉर्गनच्या अनुपस्थितीत जोस बटलरकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. याशिवाय युवा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन इंग्लंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करेल.

संघ
* भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल (यष्टिरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, थंगरासू नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा.

* इंग्लंड : जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, सॅम बिलिंग्स, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार-यष्टिरक्षक), मोईन अली, सॅम करन, टॉम करन, लिआम लिव्हिंगस्टोन, मॅट पार्किन्सन, आदिल रशीद, रीसी टॉप्ले, मार्क वूड.

* वेळ : दुपारी १.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि एचडी वाहिन्या.