लॉर्ड्सच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशा केली आहे. इंग्लंडच्या संघाने दिलेलं ३२३ धावांचं आव्हान भारतीय संघाला झेपू शकलं नाही. मात्र भारताचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंह धोनीने या सामन्यात विक्रमाची नोंद केली आहे. आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारा धोनी चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वात अशी कामगिरी करणारा धोनी बारावा फलंदाज ठरलाय. धोनीव्यतिरीक्त भारताच्या सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी वन-डे क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे.

याचसोबत जागतिक क्रिकेटमध्ये १० हजार धावांच्या जादूई आकड्याला गवसणी घालणारा तो केवळ दुसरा यष्टीरक्षक ठरला आहे. याआधी श्रीलंकेच्या कुमार संगकाराने ही करामत करुन दाखवलेली. संगकाराचा १४ हजार २३४ धावांचा विक्रम मोडणे सध्यातरी धोनीसाठी कठीण दिसत असले तरी या कामगिरीमुळे धोनी १० हजारांचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.

१० हजार धावांचा पल्ला गाठणारे खेळाडू – 

  • सचिन तेंडूलकर (भारत)- १८ हजार ४२६ धावा
  • कुमार संगकारा (श्रीलंका) – १४ हजार २३४ धावा
  • रिकी पॉण्टींग (ऑस्ट्रेलिया) – १३ हजार ७०४ धावा
  • सनथ जयसुर्या (श्रीलंका) – १३ हजार ४३० धावा
  • महेला जयवर्धने (श्रीलंका) – १२ हजार ६५० धावा
  • इंजमाम उल हक (पाकिस्तान) – ११ हजार ७३९ धावा
  • जॅक कॅलिस (द. आफ्रिका) – ११ हजार ५७९ धावा
  • सौरभ गांगुली (भारत) – ११ हजार ३६३ धावा
  • राहुल द्रविड (भारत) – १० हजार ८८९ धावा
  • ब्रायन लारा (वे. इंडिज) – १० हजार ४०५ धावा
  • तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) – १० हजार २९० धावा
  • महेंद्र सिंग धोनी (भारत) – १० हजार ४ धावा (* निवृत्त झालेला नाही)