४८२ धावांच्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने ३ बाद ५३ धावांपर्यंत मजल मारली. रविचंद्रन अश्विनच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताचा दुसरा डाव २८६ धावांवर संपुष्टात आला. गोलंदाजीला मदत मिळणाऱ्या खेळपट्टीवर भारताचे वरच्या फळीतील फलंदाज स्वस्तात माघारी परतले. पण कर्णधार विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनी इंग्लंडच्या फिरकीपटूंचा धैर्याने सामना केला. या दोघांनी ९६ धावांची भागीदारी करत भारताच्या डावाला चांगला आकार दिला. आता सामन्यातील दोन दिवसाचा खेळ शिल्लक असून इंग्लंडला विजयासाठी ४२९ धावांची गरज आहे तर भारताला ७ गड्यांची आवश्यकता आहे.

४८२ धावांच्या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर डॉम सिबली (३) अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. पाठोपाठ रॉरी बर्न्सदेखील २५ धावांवर अश्विनचा बळी ठरला. तर नाईट वॉचमन जॅक लीचने शून्यावर अक्षरला आपली विकेट बहाल केली. सध्या डॅन लॉरेन्स १९ धावांवर तर जो रूट २ धावांवर खेळत आहे.

त्याआधी, दुसऱ्या दिवशी सलामीवीर शुबमन गिल(१४) बाद झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात भारताचे भरवशाचे फलंदाज झटपट बाद झाले. चेतेश्वर पुजारा (८) कमनशिबी ठरला आणि धावबाद झाला. पण त्यानंतर रोहित शर्मा (२६), अजिंक्य रहाणे (१०), ऋषभ पंत (८) आणि अक्षर पटेल (७) यांची इंग्लंडच्या फिरकीपटूंनी शिकार केली. कर्णधार विराट कोहली आणि अनुभवी रविचंद्रन अश्विन यांनी खेळपट्टीवर तग धरला आणि भारताच्या डावाला आकार दिला. या दोघांनी ९६ धावांची भागीदारी केली. कर्णधार विराट कोहली १४९ चेंडूत ७ चौकारांसह ६२ धावांवर पायचीत झाला. त्यानंतर अश्विनने तळाच्या फलंदाजांना घेऊन सत्र संपेपर्यंत खेळपट्टी सांभाळली. त्याने १०६ धावांची खेळी केली.

त्याआधी, रोहित शर्माच्या दीडशतकी (१६१) खेळीच्या जोरावर पहिल्या डावात भारताने ३२९ धावांपर्यंत मजल मारली. फिरकीपटू मोईन अलीने ४ बळी टिपले. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव अश्विनच्या ५ बळींच्या जोरावर १३४ धावांवर आटोपला. बेन फोक्सने एकाकी झुंज देत ४२ धावांची नाबाद खेळी केली.

सामना संक्षिप्त स्वरूपात…

भारत पहिला डाव- सर्वबाद ३२९ (रोहित शर्मा-१६१; मोईन अली १२८/४)

इंग्लंड पहिला डाव- सर्वबाद १३४ (बेन फोक्स- ४२*; अश्विन ४३/५)

भारत दुसरा डाव- सर्वबाद २८६ (अश्विन १०६; मोईन अली ९८/४)

इंग्लंड दुसरा डाव- ३ बाद ५३ (रॉरी बर्न्स २५; अक्षर पटेल १५/२)

Live Blog

17:21 (IST)15 Feb 2021
भारताची सामन्यावर मजबूत पकड; दिवसअखेर इंग्लंड ३ बाद ५३

४८२ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद ५३ झाली. आता सामन्यातील दोन दिवसाचा खेळ शिल्लक असून इंग्लंडला विजयासाठी ४२९ धावांची गरज आहे तर भारताला ७ गड्यांची आवश्यकता आहे.

16:54 (IST)15 Feb 2021
इंग्लंडला तीन धक्के; भारत भक्कम स्थितीत

४८२ धावांच्या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर डॉम सिबली (३) अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. पाठोपाठ रॉरी बर्न्सदेखील २५ धावांवर अश्विनचा बळी ठरला. तर नाईट वॉचमन जॅक लीचने शून्यावर अक्षरला आपली विकेट बहाल केली.

15:42 (IST)15 Feb 2021
इंग्लंडला विजयासाठी ४८२ धावांचं आव्हान

अष्टपैलू आर. अश्विनच्या शतकी खेळीच्या बळावर दुसऱ्या डावात भारतीय संघानं २८६ धावा केल्या आहेत. पहिल्या डावांतील आघाडीच्या बळावर भारतीय संघानं इंग्लंड संघाला विजयासाठी ४८२ धावांचं आव्हान दिलं आहे. 

15:24 (IST)15 Feb 2021
अष्टपैलू अश्विनचे दमदार शतक

भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विन याने इंग्लंडच्या पहिल्या डावात पाच बळी टिपल्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावात दमदार शतक ठोकलं. अश्विनने १३५ चेंडूत १४ चौकार आणि १ षटकार खेचत शतक ठोकलं.