इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत भारताकडून पाचव्या कसोटीत हनुमा विहारीने पदार्पण केले. आणि पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटीत त्याने अर्धशतक झळकावले. शून्यावर असताना त्याला पंचांनी बाद ठरवले होते. पण DRS रिव्ह्यूमध्ये त्याला जीवदान मिळाले. या संधीचे सोने करत त्याने अर्धशतकी खेळी साकारली. या कामगिरीसह त्याने इंग्लंडच्या भूमीत एक विक्रम केला. इंग्लंडच्या भूमीत अशी कामगिरी करणारा हनुमा चौथा फलंदाज ठरला.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हनुमा फलंदाजीसाठी मैदानावर आला. पण सातव्या चेंडूवर पंचांनी त्याला पायचीत बाद ठरवले. त्यामुळे पदापर्णाच्या सामन्यात शून्यावर बाद होण्याची नामुष्की त्याच्यावर ओढवली. मात्र, समोर फलंदाजीसाठी उभा असलेल्या विराट कोहलीने DRS चा निर्णय घेण्यास हनुमाला मदत केली. या रिव्ह्यूमध्ये हनुमाला नाबाद ठरवण्यात आले. त्यानंतर हनुमाने संधीचे सोने केले आणि अर्धशतक झळकावले. त्याच्या या अर्धशतकी खेळीत त्याने ७ चौकार आणि १ षटकार लगावला. या खेळीबरोबरच त्याने सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांसारख्या खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवले.

हनुमाच्या आधी तीन भारतीय खेळाडूंनी इंग्लंडमध्ये पदार्पणाच्या कसोटीत अर्धशतक झळकावले होते. त्यात पहिले रुसी मोदी यांचे नाव आहे. त्यांनी १९४६ साली पहिल्याच कसोटीत नाबाद ५७ धावा केल्या होत्या. त्यानंतर १९९६ साली माजी कर्णधार सौरव गांगुलीने १३१ तर राहुल द्रविड याने पदार्पणाच्या कसोटी डावात ९५ धावांची खेळी केली होती.

हनुमाने आपल्या पहिल्या डावात हनुमाने ५६ धावा केल्या. फिरकीपटू मोईन अलीने त्याला झेलबाद केले. बचावात्मक फटका खेळताना यष्टिरक्षकाने त्याचा झेल टिपला. पंचांनी बाद दिल्यावर यावेळीही त्याने DRSचा आधार घेतला होता. मात्र यावेळी रिव्ह्यूमध्येही त्याने बाद ठरवण्यात आले.