भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला ३१७ धावांनी पराभूत केले. ४ कसोटींच्या मालिकेत भारताने विजयासह १-१ अशी बरोबरी साधली. विश्व अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला पुढील दोनही कसोटी सामने महत्त्वाचे आहेत. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताची फिरकी गोलंदाजी उत्तम झाली. पण वेगवान गोलंदाजांना अपेक्षित यश मिळू शकलं नाही. आता तिसरा सामना २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान अहमदाबादला होणार आहे. या सामन्यासाठी भारताचा स्टार खेळाडू संघात परतणार असल्याची चर्चा आहे.

भारत-इंग्लंड तिसरी कसोटी दिवस रात्र पद्धतीची असणार आहे. गुलाबी चेंडूने ही कसोटी खेळण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शमी आणि नवदीप सैनी दोघेही दुखापतीमुळे संघाबाहेर होते. पण तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी या दोघांना संघात देण्याबाबत विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे.

भारतातील स्थानिक क्रिकेट स्पर्धा असलेल्या विजय हजारे करंडकमध्ये शमी आणि सैनी दोघेही खेळणार होते. पण भारतीय संघाच्या व्यवस्थापनाने या दोघांनाही स्थानिक स्पर्धेत। न खेळण्याचा सल्ला दिला. मंगळवारी दुसरी कसोटी संपली त्यामुळे लवकरच उर्वरित दोन कसोटीसाठी संघाची घोषणा करण्यात येणार आहे.