वेलिंग्टन कसोटी सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेलिंग्टनच्या खेळपट्टीवरचं गवत आणि वाऱ्याची दिशा याचा पुरेपूर फायदा घेत न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांचा चांगलच कात्रीत पकडलं. सलामीवीर पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली झटपट माघारी परतले.

पृथ्वी आणि चेतेश्वर यांनी पहिल्या डावात दोन आकडी धावसंख्या गाठली, मात्र कर्णधार विराट जेमिसनच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रॉस टेलरच्या हाती झेल देत माघारी परतला, त्याने अवघ्या २ धावा केल्या. न्यूझीलंडमधे कसोटी क्रिकेटमधली विराटची ही सर्वात निचांकी धावसंख्या ठरली आहे. याआधी २०१४ साली ऑकलंड कसोटीत विराटने ४ धावा केल्या होत्या.

याचसोबत न्यूझीलंडमध्ये कसोटी सामन्यात पहिल्या डावात सर्वात कमी धावा करणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये विराटचं नाव आता सौरव गांगुलीसोबत घेतलं जाणार आहे.

भारताकडून मयांक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणेने संयमी खेळी करत पहिल्या सत्रापर्यंत संघाचा डाव सावरला. मात्र उपहारानंतरच्या सत्रानंतर मयांक अग्रवाल ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर माघारी परतला, त्याने ३४ धावा केल्या.