न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीची खराब कामगिरी सुरुच आहे. वेलिंग्टन कसोटीत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर विराट दुसऱ्या कसोटी सामन्यातही अवघ्या ३ धावा काढत माघारी परतला. टीम साऊदीने कोहलीला पायचीत बाद करत पहिल्या दिवशी उपहारानंतरच्या सत्रात भारतीय संघाला मोठा धक्का दिला.

अवश्य वाचा – Ind vs NZ : पृथ्वी शॉला सूर गवसला; अर्धशतकी खेळीसह सचिनच्या पंगतीत मिळवलं स्थान

न्यूझीलंड दौऱ्यात आतापर्यंत पहिल्या वन-डे सामन्यातलं अर्धशतक वगळता विराट कोहलीने त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ केलेला नाहीये. भारतीय संघाच्या खराब कामगिरीमागचं हे प्रमुख कारणं मानलं जातंय.

महत्वाची गोष्ट म्हणजे विराट कोहलीला बाद करत टीम साऊदीने अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीला बाद करण्याची साऊदीची ही दहावी वेळ ठरली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम साऊदीने सर्वाधिकवेळा बाद केलेले फलंदाज –

  • विराट कोहली – १०*
  • दिमुथ करुणरत्ने – १०
  • रोहित शर्मा – ९
  • तमिम इक्बाल – ९
  • अँजलो मॅथ्यूज – ८

दरम्यान याआधी सलामीवीर पृथ्वी शॉने अर्धशतक झळकावत भारतीय संघाला डाव सावरला. मयांक अग्रवाल झटपट माघारी परतल्यानंतर, पृथ्वीने चेतेश्वर पुजाराच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. तो ५४ धावा काढून बाद झाला.