पहिल्या टी २० सामन्यात न्यूझीलंडने भारताला ८० धावांनी पराभूत केले. यजमानांनी केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने दिलेले २२० धावांचे आव्हान पार करताना भारताचा डाव कोलमडला. भारतीय संघ केवळ १३९ धावांपर्यंत मजल मारु शकला. या बरोबरच हा भारताचा आव्हानाचा पाठलाग करताना सर्वात मानहानीकारक टी २० पराभव ठरला.

भारताचा टी २० इतिहासात ५० किंवा अधिक धावांनी आतापर्यंत कधीही पराभव झाला नव्हता. २०१० साली महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सर्वाधिक धावांनी पराभूत झाला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने भारताचा ४९ धावांनी पराभव केला होता. पण आज न्यूझीलंडने भारताला तब्बल ८० धावानी धूळ चारली.

दरम्यान, २२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या या सारख्या फलंदाजांनी पूर्णपणे गुडघे टेकले. शिखर धवन, विजय शंकर, महेंद्रसिंह धोनी यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न बरेच तोकडे पडले. अखेरीस ८० धावांनी विजय मिळवत न्यूझीलंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने सर्वाधिक ३ बळी टिपले.

त्याआधी, सलामीवीर कॉलिन मुनरो आणि टीम सिफर्ट यांनी केलेल्या धडाकेबाज अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने भारतासमोर २२० धावांचे आव्हान ठेवले. मुनरो आणि सिफर्ट या दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीवर जोरदार हल्लाबोल चढवला. न्यूझीलंड धावांचा डोंगर उभा करणार असे वाटत असतानाच कृणाल पांड्याने कॉलिन मुनरोला माघारी धाडत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. मुनरो माघारी परतल्यानंतरही सिफर्टने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. या खेळीदरम्यान त्याने आपले अर्धशतक साजरे केले.

कर्णधार विल्यमसनच्या साथीने सिफर्टने ४३ चेंडूत ८४ धावा पटकावल्या. खलिल अहमदने सिफर्टचा अडसर दूर केल्यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी धावसंख्येत आपापल्यापरीने भर घातली. अखेर २० षटकात न्यूझीलंडने ६ गड्यांच्या मोबदल्यात २१९ धावांपर्यंत मजल मारली. हार्दिक पांड्याने २ फलंदाजांना माघारी धाडले. तर भुवनेश्वर कुमार, खलिल अहमद, युजवेंद्र चहल आणि कृणाल पांड्याने प्रत्येकी १ बळी घेतला.