कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाला अखेरीस आपल्या पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन कसोटी सामन्यात, यजमान संघाने भारतावर १० गडी राखून मात केली. एका क्षणाला भारतीय संघाला डावाने पराभव स्विकारावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र तळातल्या फलंदाजांनी ही नामुष्की टाळली. दुसऱ्या डावात भारतीय संघाने न्यूझीलंडला केवळ ९ धावांचं आव्हान दिलं. लॅथम आणि ब्लंडल या फलंदाजांनी विजयासाठी आवश्यक असलेल्या धावांची औपचारिकता पूर्ण करत न्यूझीलंडला मालिकेत १-० अशी आघाडी मिळवून दिली आहे.

अवश्य वाचा – Ind vs NZ : या संघाला पॅसिफिक महासागरात बुडवायला हवं !

भारतीय संघाच्या या कामगिरीनंतर माजी कर्णधार कपिल देव यांनी संघनिवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. “तुमच्या संघात एवढे दिग्गज फलंदाज असताना, तुम्ही दोन डावांमध्ये एकदाही २०० धावा पार करु शकला नाहीत. याचाच अर्थ भारतीय फलंदाजांना न्यूझीलंडमधील परिस्थितीशी जुळवून घेता आलेलं नाही. भारतीय संघाला अधिक चांगल्या निजोजनाची गरज आहे. संघामध्ये खूप बदल जाणवतो आहे, यामागचं कारण मला खरंच माहिती नाही. खेळाडूंना पाठींबा देण्याचं काम हे संघ व्यवस्थापनाचं असतं. ज्यावेळी संघात सारखे बदल होत असती, तर हे शक्य होणार नाही. राहुल सध्या चांगल्या फॉर्मात आहे, पण त्याला कसोटी संघात स्थान नाही, यामागचं कारणच मला समजलं नाही”, कपिल देव एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

अवश्य वाचा – Ind vs NZ : राईचा पर्वत करु नका, एका पराभवाने काही होत नाही – विराट कोहली

दरम्यान, सामना संपल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने भारताच्या पराभवाचं कारण सांगितलं. “नाणेफेक हा सगळ्यात मोठा मुद्दा होता, ज्याचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला. आतापर्यंत आमची फलंदाजी कोणत्याही मैदानावर चांगली होईल असा आम्हाला विश्वास होता, मात्र या सामन्यात असं काहीच झालं नाही. २२०-२३० ची धावसंख्या या मैदानावर पुरेशी होती, मात्र पहिल्या डावातील फलंदाजीमुळे आम्ही बॅकफूटला गेला. यातच न्यूझीलंडने आघाडी घेतल्यामुळे आमच्यावर दबाव आला.” या मालिकेतला दुसरा सामना २९ फेब्रुवारीपासून ख्राईस्टचर्चच्या मैदानावर खेळवला जाईल.

अवश्य वाचा – Ind vs NZ : कर्णधार विराट कोहलीने सांगितलं भारताच्या पराभवाचं कारण…