लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत भारतीय संघात जागा मिळालेल्या रोहित शर्माने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम कसोटीत रोहितने शतकी खेळी करत भारताला भक्कम सुरुवात करुन दिली. रोहितचं कसोटीमध्ये सलामीवीर म्हणून हे पहिलंच शतक ठरलं. त्याने आफ्रिकन गोलंदाजांची धुलाई करताना २४४ चेंडूचा सामना करत १७६ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत २३ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.

या खेळीदरम्यान रोहित शर्माने अनेक विक्रम आपल्या नावे जमा केले आहेत. त्रिशतकी भागीदारीनंतर केशव महाराजने रोहित शर्माचा अडसर दूर केला. पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात यष्टीरक्षक क्विंटन डी-कॉकने रोहितला यष्टीचीत केलं. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करुन यष्टीचीत बाद झालेल्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्माने अव्वल स्थान पटकावलं आहे. रोहितने राहुल द्रविड, महेंद्रसिंह धोनी आणि मुरली विजय यांना मागे टाकलं आहे, अशी आहे फलंदाजांची संपूर्ण यादी….

  • रोहित शर्मा विरुद्ध दक्षिण आफ्रिका – विशाखापट्टणम – १७६ धावा
  • मुरली विजय विरुद्ध श्रीलंका – दिल्ली – १५५ धावा
  • राहुल द्रविड विरुद्ध इंग्लंड – लीड्स – १४८ धावा
  • महेंद्रसिंह धोनी विरुद्ध पाकिस्तान – फैसलाबाद – १४८ धावा

दरम्यान दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रापर्यंत भारताने त्रिशतकी मजल मारत सामन्यावर आपली पकड मजूत केली.

अवश्य वाचा – Ind vs SA : ‘हिटमॅन’ चमकला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या कामगिरीशी बरोबरी