अँटीग्वा कसोटीत भारतीय संघाने विंडीजवर मात करत २ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या रोहित शर्माला कसोटी संघात सलामीवीराची जागा द्यावी अशी मागणी काही दिवसांपूर्वी सौरव गांगुलीने केली होती. मात्र रोहितला कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी अजुन वाट पहावी लागेल, असं वक्तव्य माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने केलं आहे.

“रोहितला कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी अजून वाट पहावी लागेल. अजिंक्य रहाणेने चांगली कामगिरी केली आहे, याचसोबत संघात हनुमा विहारीही अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडतो आहे. त्यामुळे रोहितला आपली संधी मिळण्यासाठी वाट पहावी लागेल आणि ज्यावेळा संधी मिळेल त्यावेळी त्याला चांगली कामगिरी करुन दाखवावी लागेल.” गौतम गंभीर पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना ३० ऑगस्टपासून जमैकाच्या मैदानावर सुरु होणार आहे. पहिल्या कसोटीत मयांक अग्रवाल आणि लोकेश राहुल या जोडीला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही, त्यामुळे दुसऱ्या कसोटीत रोहित शर्माला संघात संधी मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.