देवधर करंडक क्रिकेट स्पर्धा

भारत ‘अ’ संघावर सहा गडी राखून मात

युवा फलंदाज शुभमन गिलने साकारलेल्या नाबाद झुंजार शतकाच्या बळावर भारत ‘क’ संघाने देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात भारत ‘अ’ संघावर सहा गडी आणि १८ चेंडू राखून विजय मिळवला. या विजयाबरोबरच त्यांनी अंतिम फेरी गाठली असून शनिवारी होणाऱ्या लढतीत त्यांच्यासमोर भारत ‘ब’ संघाचे कडवे आव्हान असणार आहे.

प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन (६९) आणि नितीश राणा (६८) यांच्या दमदार अर्धशतकांमुळे भारत ‘अ’ संघाने निर्धारित ५० षटकांत सहा फलंदाजांच्या मोबदल्यात २९३ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. अनमोलप्रीत सिंग (५९) आणि केदार जाधव (नाबाद ४१) यांनीही संघाच्या धावसंख्येत मोलाची भर घातली.

प्रत्युत्तरात, भारत ‘क’ संघाने कर्णधार अजिंक्य रहाणेला (१४) लवकर गमावले. मात्र त्यानंतर आलेल्या गिलने संघाची सूत्रे आपल्या हाती घेतली. इशान किशनला साथीला घेत दोघांनी चौथ्या गडय़ासाठी १३१ धावांची भागीदारी रचली. किशन (६९) धावांवर बाद झाल्यावर सूर्यकुमार यादवच्या (नाबाद ५६) साथीने पाचव्या गडय़ासाठी ८० धावांची अभेद्य भागीदारी केली. आठ चौकार व तीन षटकारांसह १०६ धावांची खेळी करणाऱ्या गिलनेच ४७व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक

भारत ‘अ’ : ५० षटकांत ६ बाद २९३ (अभिमन्यू ईश्वरन ६९, नितीश राणा ६८; विजय शंकर ३/४०) पराभूत वि. भारत ‘क’ : ४७ षटकांत ४ बाद २९६ (शुभमन गिल नाबाद १०६, इशान किशन ६९; शाम्स मुलानी १/५१).

* सामनावीर : शुभमन गिल