दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धचा चौथा एकदिवसीय सामना आज

थिरुवनंतपुरम : भारत ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या अनधिकृत मालिकेत यजमानांनी ३-० असे वर्चस्व गाजवले असले तरी अखेरच्या दोन सामन्यांसाठी शिखर धवनचा भारत अ संघात समावेश करण्यात आला आहे. बहरात नसलेल्या धवनने चमकदार कामगिरीद्वारे भारतीय संघात पुनरागमन करण्याचे ध्येय बाळगले आहे.

अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला दुखापत झाल्यामुळे त्याच्या जागी ३३ वर्षीय धवनचा समावेश करण्यात आला आहे. धवनने गेल्या पाच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अवघ्या ६५ धावा केल्या आहेत. हाताच्या दुखापतीमुळे धवनला विश्वचषक स्पर्धा अर्धवट सोडून मायदेशी परतावे लागले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेला १५ सप्टेंबरपासून सुरुवात होत असल्यामुळे या दोन सामन्यांद्वारे भारतीय संघात स्थान मिळवण्याचे धवनचे ध्येय आहे.

दक्षिण आफ्रिका ‘अ’ विरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात मनीष पांडेऐवजी आता श्रेयस अय्यस भारत अ संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. त्याचबरोबर पुढील दोन सामन्यांसाठी आता इशान किशनऐवजी संजू सॅमसनकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी असेल. दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी इशान बेंगळूरु येथे रवाना झाला असून तो इंडिया रेडचे प्रतिनिधित्व करणार आहे. युवा फलंदाज शुभमन गिलला पहिल्या दोन सामन्यांमध्ये मोठी खेळी करता आली नव्हती. त्यामुळे त्याच्यासाठी हा सामना महत्त्वपूर्ण असेल.

’ सामन्याची वेळ : सकाळी ९ वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १