केएल राहुलच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने धरमशाला कसोटी ८ विकेट्सने जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्धची बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका २-१ अशी खिशात घातली. २०१४-१५ साली ऑस्ट्रेलियात झालेल्या या मालिकेचे जेतेपद ऑस्ट्रेलियाकडे होते. कोहलीच्या नेतृत्त्वाखालील संघाने बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेचा विजयश्री यावेळी खेचून आणला.  गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेली ही मालिका खेळाडूंनी ठोकलेली शतकं, बळींची रास आणि त्यापेक्षा प्रतिस्पर्धी खेळाडूंमधील बाचाबाची, स्लेजिंगमुळे चर्चेचा विषय ठरली. पण अखेरीस भारतीय संघाने कसोटीतील आपली ‘दादागिरी’ कायम राखत ऑस्ट्रेलियाला लोळवलं. क्रमवारीतील नंबर एकवर असलेल्या टीम इंडियाने यंदाच्या हंगामात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. कसोटी मालिकेत तब्बल २५ विकेट्स आणि धावांची टांकसाळ उघडणारा रविंद्र जडेजा सामनावीरासोबत मालिकावीराचा मानकरी ठरला.

 

धरमशाला कसोटीच्या चौथ्या दिवशी कर्णधार अजिंक्य राहणे आणि केएल राहुलची खेळी महत्त्वाची ठरली. धरमशाला कसोटी जिंकण्यासाठी केवळ १०६ धावांचे आव्हान होते. तिसऱया दिवसाच्या अखेरीस भारताने बिनबाद १९ धावा देखील केल्या होत्या. त्यामुळे आज विजयासाठी केवळ ८७ धावांची गरज असताना मुरली विजय(८) बाद झाला. तर चेतेश्वर पुजारा शून्यावर धावचीत झाला. पण कर्णधार अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना कोणतीही संधी न देता अगदी पहिल्या चेंडूपासूनच तडाखेबाज फटकेबाजीला सुरूवात केली. तर दुसऱया बाजूला केएल राहुलने आपली संयमी खेळी सुरू ठेवली. दोघांनी तिसऱया विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.