भारतातले वातावरण, उसळी आणि वेग नसणाऱ्या खेळपट्टय़ा पाहता इथे वेगवान गोलंदाज निर्माण होणे कठीण आहे, पण अशक्य मात्र नाही. काही गोलंदाजांमध्ये ती कुवत असते, ती त्यांनी समजून घेऊन चांगले प्रशिक्षण आणि कठोर मेहनत घेतली, तर भारतातही वेगवान गोलंदाजांची फळी तयार होऊ शकते. ऑस्ट्रेलियामध्ये प्रत्येक खेळपट्टी निराळी आहे, त्यानुसार खेळपटय़ा बनवल्यास गोलंदाजांसाठी ते योग्य ठरेल, असा आशावाद ऑस्ट्रेलियाचा माजी महान गोलंदाज आणि एमआरएफ पेस अकादमीचा संचालक ग्लेन मॅकग्राने खास मुलाखतीमध्ये व्यक्त केला. या वेळी मॅकग्राने भारताची पाच गोलंदाजांची रणनीती, त्यांचा आक्रमकपणा, कोहलीची नेतृत्व शैली, गोलंदाजीचे यशस्वी सूत्र याबाबतही मत व्यक्त केले.

चारच गोलंदाज हवेत
भारतासह बहुतांशी संघ सध्या पाच गोलंदाजांनिशी खेळताना दिसत आहे; पण माझ्या मते संघात चार गोलंदाज हवेत आणि पाचवा अष्टपैलू खेळाडू असायला हवा. चार फलंदाज घेऊन खेळताना तुम्हाला एक अतिरिक्त फलंदाज खेळवता येतो; पण पाच गोलंदाज घेऊन खेळताना फलंदाजांनी मोठय़ा खेळी साकारायला हव्यात.

यष्टिरक्षक चांगला फलंदाज असावा
यष्टिरक्षक हा चांगला फलंदाजही असायला हवा, पण असे खेळाडू फार कमी पाहायला मिळतात. आमच्या संघात अॅडम गिलख्रिस्ट होता. श्रीलंकेचा कुमार संगकाराही अद्भुत खेळाडू आहे. यांच्यासारखे खेळाडू असले की सामना जिंकण्याची टक्केवारी वाढते.

आक्रमकपणापेक्षा सकारात्मकपणा हवा
विराट कोहलीकडे नेतृत्व आल्यापासून आम्ही आक्रमक खेळ करणार, असे तो नेहमी म्हणत असतो. माझ्या मते आक्रमकपणापेक्षा तुमच्या खेळामध्ये सकारात्मकपणा असायला हवा. तुमच्याकडून चांगल्या धावा व्हायला हव्यात, जास्त बळी मिळवायला हवेत. तुमच्या देहबोलीतून आक्रमकपणा दिसला तर एखाद वेळेस चालू शकेल, पण कामगिरीत मात्र सकारात्मकपणा हवा.

कोहलीमध्ये चांगले नेतृत्वगुण
विराट कोहली हा आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. जलद धावा करण्यासाठी तो ओळखला जातो. त्याचबरोबर त्याच्याकडे चांगले नेतृत्वगुण आहेत. त्याच्यामध्ये संघाला जिंकवून देण्याची क्षमता आहे. तो कधीही माघार घेत नाही आणि हेच काही वेळा पथ्यावर पडते.

यशस्वी गोलंदाजीची त्रिसूत्री
योग्य टप्पा आणि दिशा ठेवत गोलंदाजी करायला हवी, असे नेहमीच म्हटले जाते, पण हे नेमके कसे असते ते तुम्हाला सांगतो. यामध्ये तीन भाग आहेत. तुम्ही चेंडू उजव्या यष्टीवर किंवा त्याच्या थोडा बाहेर ठेवायला हवा. त्यामुळे फलंदाज मोठा फटका मारण्याच्या नादात बाद होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे यॉर्कर चेंडू टाकण्याची कुवत असायला हवी आणि तिसरी गोष्ट म्हणजे उसळते चेंडू तुम्हाला योग्य वेळी टाकता यायला हवेत.

विजयाची टक्केवारी वाढली
पूर्वी बऱ्याच संघांचा सामना अनिर्णीत राखण्याकडेच कल असायचा, पण आत्ताचे क्रिकेट बदलले आहे. ट्वेन्टी-२० च्या युगात क्रिकेट अधिक जलद झाले आहे. माझ्या मते प्रत्येक सामना हा जिंकण्यासाठीच खेळायचा असतो. कारण कसोटी क्रिकेटमध्ये एका सत्रात विजय आणि पराभव पदरी पडू शकतो.

स्लेजिंग हा क्रिकेटचाच एक भाग
स्लेजिंग करणे चुकीचे आहे, असे मला तरी व्यक्तिश: वाटत नाही. कारण तो एक खेळाचाच भाग आहे. प्रसारमाध्यमांनी स्लेजिंगला मोठे केले आहे. कोणी कितीही स्लेजिंग केले तरी तुम्ही मानसिकरीत्या कणखर असायला हवे, तोच खरा कसोटीचा काळ असतो.

स्टेन, अँडरसन चांगले गोलंदाज
सध्या क्रिकेटविश्वामध्ये डेल स्टेन आणि जेम्स अँडरसन हे दोनच चांगले वेगवान गोलंदाज पाहायला मिळतात. स्टेनकडे चांगला वेग आहे, तर अँडरसन वेगाबरोबर चेंडू अप्रतिमपणे स्विंग करतो. या दोघांनाही आपल्यामधील गुणवत्ता माहिती आहे आणि त्यानुसार ते खेळ करू शकतात. हेच यशाचे गमक आहे.

वेगापेक्षा तंत्र महत्त्वाचे
गोलंदाजीमध्ये वेग आणि तंत्र या दोन्ही गोष्टी असतात, पण माझ्या मते वेगापेक्षा तंत्र महत्त्वाचे आहे. कारण तुम्ही सातत्याने वेगवान मारा करू शकत नाही. पाटा खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजी चांगली होत नाही, पण जर तुमच्याकडे चांगले तंत्र असले तर तुम्ही कुठल्याही खेळपट्टीवर कोणत्याही क्षणाला चांगली गोलंदाजी करू शकता.

दुखापतींचे व्यवस्थापन हवे
दुखापती गोलंदाजांच्या पाचवीलाच पुजलेल्या असतात. खेळाडू जेव्हा खेळत असतो तेव्हा त्याचे शरीराचे तापमान वाढत जाते आणि दुखापतींची शक्यता वाढते. माझ्या मते दुखापतींचे योग्य व्यवस्थापन व्हायला हवे. जेव्हा खेळाडू खेळत नसतात तेव्हाचा काळ या गोष्टीसाठी फार महत्त्वाचा असतो.