नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाची चांगलीच धुलाई करत स्वाभिमानाची लढाई जिंकली, असं मत पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने व्यक्त केलं. शोएब अख्तरनं आपल्या यूट्युब चॅनलवर भारतीय संघाच्या विजयाचं विश्लेषण केलं आहे. यामध्ये विराट-रोहितच्या कामगिरीचं त्यानं कौतुक केलं तर भारताला धोनीचा विकल्प मिळाल्याचं सांगितलं आहे.

शोएब अख्तरच्या मते मर्यादित षटकांच्या सामन्यात मनिष पांडेच्या रूपानं भारतीय संघाला एम.एस. धोनीचा पर्याय मिळाला आहे. पांडे भारतीय संघात धोनीची फिनिशरची जागा भरून काढू शकतो असं शोएबनं आपल्या व्हिडीओत म्हटलेय.

यू-ट्युब चॅनलवरील आपल्या व्हिडीओत शोएब म्हणतोय,’ मनिष पांडेच्या रूपानं भारतीय संघाला अखेर धोनीचा पर्याय मिळाला. धोनीसारखे मनिषही चांगल्या फिनिशरची भूमिका वटवू शकतो. मनिष पांडेशिवाय श्रेअस अय्यरही परिपूर्ण खेळाडू आहे. अय्यर आणि पांडेमुळे भारतीय फंलदाजीची खोली वाढतेय. हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये खेळल्यामुळे दबावातही त्यांची फलंदाजी चांगली होतेय.

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीनं विश्वचषकानंतर एकही एकदिवसीय सामना खेळला नाही. त्यादरम्यान भारतीय संघात मध्यक्रम आणि फिनिशरसाठी नवनवे खेळाडू खेळलं.धोनीचा पर्यायी खेळाडू भारताला आतापर्यंत मिळाला नाही. पण, शोएबच्या मते पांडे धोनीची जागा घेऊ शकतो. भारताने राहुल, पंत, सॅमसन, पांडे, अय्यर आणि जाडेजासारख्या खेळाडूला धोनीच्या जागेवर खेळवलं मात्र, अद्याप यश आले नाही.

भारतानं ऑस्ट्रेलियाला अक्षरश: ठेचलं – शोएब अख्तर

“विराट कोहली हा अप्रतिम कर्णधार आहे. तो मानसिकदृष्ट्या अतिशय कणखर आहे. पुनरागमन कसं करावं हे त्याला नेमकं माहिती आहे. टीम इंडियाचे खेळाडूदेखील त्यात पारंगत आहेत. धक्कादायक पराभवानंतर ते कधीही धीर सोडत नाहीत. तुमच्या संघात जेव्हा रोहित शर्मा, शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांसारखे खेळाडू असतील आणि तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला बंगळुरूच्या मैदानावर ३०० पेक्षा कमी धावांवर बाद केलेत, तर तुम्ही नक्कीच सामना जिंकणार आहात ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ही मालिका म्हणजे स्वाभिमानाची लढाई होती. त्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ठेचलं”, असं अख्तर म्हणाला.

रोहितचा ‘उदो उदो’

जेव्हा रोहित शर्मा चांगल्या लयीत असतो, तेव्हा त्याच्यासाठी कोणताही चेंडू सोपा किंवा अवघड नसतो. बंगळुरूसारख्या खेळपट्टीवर तो आक्रमक खेळ करतो. एकेकाळी ऑस्ट्रेलियाचा संघ देशात अव्वल होता, त्यावेळी ते क्रिकेटवर सत्ता गाजवत होते. आता भारतही तेच करतो आहे, असं अख्तरने नमूद केले.