विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात टी-२० मालिकेत २-१ ने बाजी मारत वन-डे मालिकेतल्या पराभवाचा बदला घेतला. अखेरचा वन-डे सामना आणि टी-२० मालिकेत भारतीय फलंदाजांनी आश्वासक खेळी केली. परंतू गलथान क्षेत्ररक्षणामुळे भारताच्या या विजयालाही वादाची किनार लाभली आहे. टी-२० मालिकेत तर कर्णधार विराट कोहलीसह अनेक खेळाडूंनी सोपे झेल सोडत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना मदत केली. अनेक माजी खेळाडूंनी भारताच्या या खराब कामगिरीबद्दल चिंता व्यक्त केली. माजी क्रिकेटपटू आणि आपल्या काळातला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून परिचीत असलेल्या मोहम्मद कैफने भारतीय खेळाडूंना टी-२० विश्वचषक जिंकायचा असेल तर फिल्डिंगमद्ये सुधार करा असा सल्ला दिला आहे.

“सोपे झेल सोडणं, हातात असेलला बॉल न पकडणं अशा गोष्टी तुमच्याकडून अपेक्षित नाहीयेत. टी-२० मालिकेत आपलं क्षेत्ररक्षण खूप वाईट झालं. पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यात भारतामध्ये टी-२० विश्वचषक आहे. त्यातही अशीच फिल्डिंग होणार असेल तर महत्वाच्या सामन्यांमध्ये आपल्याला फटका बसू शकतो. स्पर्धा जिंकायची असेल भारतीय खेळाडूंना फिल्डिंग सुधारावी लागेल. आमच्यावेळी आम्ही अजित आगरकर, श्रीनाथ, झहीर खान यांच्या गोलंदाजीवर कॅच सोडला तर आम्हाला पुढच्या दिवशी दोन तास अधिक सराव करावा लागायचा. सध्या भारतीय संघात सर्व तरुण गोलंदाज आहेत. एखाद्यावेळी फिल्डिंग खराब झाली तर ते त्यावर काही बोलत नाहीत आणि लगेच रन-अपच्या दिशेने जातात. आमच्यावेळी कॅच सोडला की गोलंदाजांची नजर पुरेशी असायची. सोपे कॅच सोडणं हा खेळाचा भाग असूच शकत नाही.” मोहम्मद कैफ Sony Sports वाहिनीवरील कार्यक्रमात बोलत होता.

अवश्य वाचा – स्टम्पमागे धोनी सल्ला देण्यासाठी नसल्यामुळे फिरकीपटूंची कामगिरी खालावतेय – किरण मोरे

क्षेत्ररक्षणातील खराब कामगिरीनंतरही भारताने टी-२० मालिकेत विजय मिळवला. १७ डिसेंबरपासून भारतीय संघासमोर कसोटी मालिकेचं आव्हान असणार आहे. ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत बाजी मारायची असेल तर भारतीय संघाला क्षेत्ररक्षण सुधारण्यावर भर द्यावा लागणार असल्याचंही कैफ म्हणाला.