ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला सलग दुसऱ्या वन-डे सामन्यात पराभव स्विकाराला लागला. दोन्ही वन-डे सामन्यांत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई करत त्रिशतकी धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय फलंदाज अयशस्वी ठरले. विराट कोहली, शिखर धवन, हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचा अपवाद वगळता भारतीय फलंदाज अयशस्वी ठरले. माजी कसोटीपटू आकाश चोप्राच्या मते त्रिशतकी धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाला रोहित शर्माची गरज आहे.

“त्रिशतकी धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो त्यावेळी तुमची सुरुवात चांगली असणं गरजेचं आहे. मधल्या षटकांमध्ये भागीदारी करुन आणि फटकेबाजी करुन काही साध्य होत नाही. पहिल्या ३ विकेट गमावल्यानंतरही तुम्ही सामना जिंकण्याची अपेक्षा करत असाल तर ते शक्य नाही. यासाठी सलामीच्या फलंदाजांपैकी दोघांनी फटकेबाजी करत शतक झळकावणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघात रोहित शर्मा असणं गरजेचं आहे. त्रिशतकी धावसंख्येचा पाठलाग करताना तो फटकेबाजी करु शकतो.” आकाश चोप्रा आपल्या यु-ट्यूब चॅनलवरील कार्यक्रमात बोलत होता.

अवश्य वाचा – रोहितच्या दुखापतीबद्दल विराट-रवी शास्त्रींना देण्यात माहिती आली

भारतीय संघाकडून शिखर धवन आणि मयांक अग्रवाल जोडीने चांगली सुरुवात केली. परंतू अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर दोन्ही फलंदाज माघारी परतले. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. सुरुवातीला दोन्ही फलंदाजांनी मैदानावर स्थिरावण्याला प्राधान्य दिला. परंतू यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दोघांना फारसे मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. श्रेयस अय्यरला बाद करत हेन्रिकेजने भारताची जोडी फोडली, त्याने ३८ धावा केल्या. यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहली यांची जोडी जमली. यादरम्यान विराटने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं.

अवश्य वाचा – BLOG : काहीतरी गंडलंय हे नक्की, फक्त विराटने ते मान्य करायला हवं !

दुसऱ्या बाजूने लोकेश राहुलही त्याला चांगली साथ देत होता. ही जोडी मैदानावर कमाल दाखवणार असं वाटत असतानाच हेजलवूडने विराटला माघारी धाडलं, त्याने ८९ धावांची खेळी केली. कोहली बाद झाल्यानंतर लोकेश राहुलनेही जबाबदारी स्विकारत पांड्याच्या जोडीने फटकेबाजीचा प्रयत्न केला. अर्धशतकी खेळी केल्यानंतर तो देखील झॅम्पाच्या गोलंदाजीवर ७६ धावा काढून बाद झाला. यानंतर पॅट कमिन्सने एकाच षटकात जाडेजा आणि पांड्याला बाद करत भारताच्या आक्रमणातली हवाच काढली. यानंतर भारताच्या अखेरच्या फळीतले फलंदाज फक्त हजेरीवीर ठरले. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने ३, जोश हेजलवूड आणि झॅम्पाने प्रत्येकी २ तर हेन्रिकेज आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

अवश्य वाचा – भारतीय संघाला रोहित-विराटव्यतिरीक्त सातत्याने धावा करणाऱ्या फलंदाजांची गरज – हरभजन सिंह