भारत-न्यूझीलंड सराव सामना

वयाची २९ वर्षे पूर्ण करणारा मयांक अगरवाल (८१ धावा) आणि ऋषभ पंत (७०) यांनी रविवारी न्यूझीलंड एकादशविरुद्धच्या तीन दिवसीय सराव सामन्यात दमदार अर्धशतके झळकावली. उभय संघांतील सामना अनिर्णित राहिला. आता २१ फेब्रुवारीपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल.

शनिवारच्या बिनबाद ५५ धावांवरून पुढे खेळताना भारताने मुंबईकर पृथ्वी शॉला दिवसाच्या तिसऱ्याच षटकात गमावले. पृथ्वीने सहा चौकार आणि एका षटकारासह ३९ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावरील शुभमन गिलने (८) पुन्हा निराशा केली.

मात्र त्यानंतर आलेल्या पंतच्या साथीने मयांकने फलंदाजीचा पुरेपूर आनंद लुटला. दोघांनी तिसऱ्या गडय़ासाठी १०० धावांची भागीदारी रचली. १० चौकार आणि ३ षटकारांसह ८१ धावा केल्यानंतर मयांक निवृत्त होऊन माघारी परतला. तर पंतने बाद होण्यापूर्वी प्रत्येकी चार चौकार-षटकारांसह ७० धावा फटकावून फॉर्मात परतल्याचे संकेत दिले.

उपाहारानंतर एक तासाचा खेळ झाल्यानंतर दोन्ही संघांनी संमतीने खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. भारताने दुसऱ्या डावात ४ बाद २५२ धावा केल्या. वृद्धिमान सहा ३०, तर रविचंद्रन अश्विन १६ धावांवर नाबाद राहिला. मात्र कर्णधार कोहली दुसऱ्या डावातही फलंदाजीला आला नाही.

सुमार कामगिरीचा अधिक विचार न केलेलाच बरा -मयांक

हॅमिल्टन : न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्धच्या दौऱ्यात आणि न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही मी अपयशी ठरलो असलो तरी त्या कामगिरीविषयी अधिक विचार न करता आगामी कसोटी मालिकेत छाप पाडण्यासाठी मी उत्सुक आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कसोटी सलामीवीर मयांक अगरवालने व्यक्त केली.

भारत ‘अ’ संघाकडून खेळणाऱ्या २९ वर्षीय मयांकला न्यूझीलंड ‘अ’विरुद्ध एकही अर्धशतक झळकावता आले नाही. त्याशिवाय न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात स्थान लाभूनही त्याने अनुक्रमे ३२, ३, १ अशा धावा केल्या. परंतु सराव सामन्याच्या दुसऱ्या डावात अर्धशतक साकारून त्याने पुनरागमनाचे संकेत दिले. ‘‘न्यूझीलंडमधील परिस्थितीशी जुळवून घेण्यास मला फार वेळ लागला. परंतु फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्या मार्गदर्शनानुसार मी फलंदाजीच्या तंत्रात किंचितशी सुधारणा केली. त्याशिवाय गेल्या काही महिन्यांतील सुमार कामगिरीविषयी फारसा विचार करण्यासाठी माझ्याकडे आता वेळही नसून आगामी कसोटी मालिकेत मी भारतीय संघासाठी नक्कीच सर्वोत्तम योगदान देईन,’’ असे मयांक म्हणाला.