भारताचे आता चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेच्या उपांत्य फेरीतील स्थानाकडे डोळे लागून राहिले आहेत. ओव्हलवर मंगळवारी भारताचा ‘ब’ गटातील सामना अनिश्चित कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजशी आहे. दोन्ही संघांनी आपले सलामीचे सामने जिंकले असल्यामुळे या विजयानिशी पुढील फेरी निश्चित करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल.
कार्डिफ येथे विश्वविजेत्या भारताने दुखापतीमुळे बेजार झालेल्या दक्षिण आफ्रिकेचा २६ धावांनी पराभव केला. त्या सामन्यात भारताने ७ बाद ३३१ धावांचे आव्हान उभारले होते. त्यानंतर शुक्रवारी सनसनाटी सामन्यात वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा फक्त दोन विकेट्सने पराभव केला.
पण मंगळवारी सामना भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आहे. दोन्ही संघांतील बहुतांशी खेळाडू आयपीएलच्या हंगामात क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटून इंग्लंडला आले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांतील खेळाडूंना एकमेकांची बलस्थाने आणि कच्चे दुवे यांची पुरेशी जाणीव आहे. प्रतिस्पर्धी संघनायक महेंद्रसिंग धोनी आणि ड्वेन ब्राव्हो चेन्नई सुपर किंग्जचे संघसहकारी. विराट कोहली आणि ख्रिस गेल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ‘हुकमी एक्के’. परंतु इथे लढाई आहे ती राष्ट्रीय प्रतिष्ठेची.
वेस्ट इंडिजचा फलंदाज मार्लन सॅम्युअल्स चांगलाच फॉर्मात आहे. श्रीलंकेत झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकापाठोपाठ चॅम्पियन्स करंडकसुद्धा कॅरेबियन बेटांवर नेण्याचे आमचे मनसुबे आहेत, असे तो म्हणतो.
कागदावर पाहिल्यास भारताचे पारडे अधिक जड आहे. दोन सराव सामन्यांपाठोपाठ स्पध्रेतील पहिल्या सामन्यात या संघाने तीनशे धावांचा टप्पा ओलांडला आहे. पहिल्या सामन्यात मुरली विजयला वगळून रोहित शर्माला सलामीला पाठविण्याची भारतीय संघाची चाल यशस्वी ठरली. दोन्ही सलामीवीरांनी वैयक्तिक आणि सांघिक योगदान देणारी १२७ धावांची भागीदारी रचली.
दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या संघात ठासून गुणवत्ता असली तरी त्यांच्या कामगिरीची खात्री देणे कठीण आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात विंडीजने त्यांचा कसोटी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू डॅरेन सॅमीलाच चक्क विश्रांती दिली. त्यानंतर पाकिस्तानचे १७० धावांचे आव्हान पेलताना त्यांना झगडावे लागले.
ओव्हलच्या खेळपट्टीवर ख्रिस गेल, जॉन्सन चार्ल्स, डॅरेन ब्राव्हो आणि सॅम्युअल्स या आघाडीच्या फळीला भारतीय वेगवान माऱ्याचा सामना करायचा आहे. उमेश यादव, भुवनेश्वर कुमार आणि इशांत शर्मा यांच्यावर भारताची मदार आहे. याचप्रमाणे चॅम्पियन्स करंडक स्पध्रेत पहिली १५ षटके निर्णायक ठरत असल्याचे प्रत्ययास येत आहे.
चॅम्पियन्स करंडक स्पध्रेत विंडीजची भारताविरुद्धची कामगिरी २-१ अशी आहे. १९९८ (ढाका) आणि २००६ (अहमदाबाद)मध्ये वेस्ट इंडिजने मिळवलेले दोन्ही विजय हे भारतीय उपखंडातील आहेत. तथापि, २००९मध्ये जोहान्सबर्गमध्ये भारताने विंडीजला ७ विकेट्स राखून हरवले होते. त्या सामन्यात मध्यमगती गोलंदाज प्रवीण कुमारने २२ धावांत ३ बळी घेतले होते.
वेस्ट इंडिजचा संघ आपल्या वेगवान आणि फिरकी माऱ्यासह भारताशी सामना करेल. वेगवान गोलंदाज केमार रोच, रवी रामपॉल आणि टिनो बेस्ट या वेगवान गोलंदाजांसह जादुई फिरकी गोलंदाज सुनील नरिन त्यांच्याकडे आहे.
उभय संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), आर. अश्विन, शिखर धवन, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, इरफान पठाण, सुरेश रैना, इशांत शर्मा, रोहित शर्मा, मुरली विजय, विनय कुमार, उमेश यादव.
वेस्ट इंडिज : ड्वेन ब्राव्हो (कर्णधार), दिनेश रामदिन, टिनो बेस्ट, डॅरेन ब्राव्हो, जॉन्सन चार्ल्स, ख्रिस गेल, जेसन होल्डर, सुनील नरिन, किरॉन पोलार्ड, रवी रामपॉल, केमार रोच, डॅरेन सॅमी, मार्लन सॅम्युअल्स, रामनरेश सरवान, डेव्हॉन स्मिथ.
सामन्याची वेळ : दुपारी ३ वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट आणि स्टार स्पोर्ट्स-२.