पहिल्या कसोटीतल्या पराभवानंतर भारतीय संघ व्यवस्थापन आणि विराट कोहलीवर, संघनिवडीवरुन होणारी टीका थांबते न थांबते तोच माजी खेळाडू सुनिल गावसकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. सेंच्युरिअन कसोटीसाठी भारतीय संघ निवडीवर गावसकर यांनी मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत शिखर धवनला विश्रांती देऊन लोकेश राहुलला संघात जागा दिली.

मात्र भारतीय संघाचा हाच निर्णय गावसकरांच्या काहीकेल्या पचनी पडलेला दिसत नाहीये. शिखर धवनला दुसऱ्या कसोटी सामन्यात बळीचा बकरा बनवल्याचं पडखर मत गावसकर यांनी व्यक्त केलं आहे. “फक्त एका खराब खेळीचा अवकाश, शिखर धवन संघाबाहेर गेलाच म्हणून समजा. प्रत्येकवेळी शिखर धवनला संघाबाहेर बसवण्याचा निर्णय अनाकलनीय असल्याचं,” गावसकर यांनी बोलून दाखवलं. दुसऱ्या कसोटीत शिखर धवनसोबत भारतीय संघाने वृद्धीमान साहा आणि भुवनेश्वर कुमारला बाहेर बसवून इशांत शर्मा आणि पार्थिव पटेलला संघात जागा दिली आहे.

अवश्य वाचा – रहाणेच्या गच्छंतीसाठी आग्रही असणारी माणसं आता त्याचं समर्थन करतायत, विराटचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर

वृद्धीमान साहा दुखापतीमुळे सामना खेळू शकला नाही, त्यामुळे पार्थिव पटेलचा संघातला समावेश समजू शकतो. मात्र पहिल्या कसोटीत चांगली कामगिरी करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला संघाबाहेर बसवून इशांत शर्माला जागा देऊन नेमकं काय साध्य होणार आहे? भारतीय संघ व्यवस्थापन याऐवजी जसप्रीत बुमराह किंवा मोहम्मद शमीला संघाबाहेर करु शकलं असतं, मात्र भुवनेश्वरला संघाबाहेर जावं लागणं ही बाबही आपल्या पचनी पडली नसल्याचं गावसकर म्हणाले. पहिल्या कसोटीत भारताला दक्षिण आफ्रिकेकडून ७२ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

अवश्य वाचा – घरच्या मैदानावर खेळता तसे आफ्रिकेत खेळू नका, सचिनने टोचले भारतीय फलंदाजांचे कान