एकामागोमाग एक विकेट जाण्याचं सत्र सुरु असताना कर्णधार विराट कोहलीने एका बाजूने लावून धरल्यामुळे भारताने सेंच्युरिअन कसोटीत आपलं आव्हान कायम राखलं आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार विराट कोहली ८५ धावांवर तर हार्दिक पांड्या ११ धावांवर खेळत होता. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ३३५ धावांवर संपवल्यानंतर भारताने आपल्या डावाची सावधपणे सुरुवात केली. मात्र यानंतर भारताने लोकेश राहुल आणि चेतेश्वर पुजारा जोडीला लवकर गमावलं. यानंतर मुरली विजय आणि विराट कोहलीने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. मात्र केशव महाराजने मुरली विजयला माघारी धाडत भारताची जमलेली जोडी फोडली. यानंतर उरलेले फलंदाज मोठी भागीदारी रचण्यात अपयशी ठरले.
दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज, मॉर्ने मॉर्कल, कगिसो रबाडा आणि निगडी यांना प्रत्येकी १-१ बळी मिळाला. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेकडे १५२ धावांची आघाडी कायम आहे. यामुळे तिसऱ्या दिवशी भारताचे फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या माऱ्याचा कसा सामना करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असणार आहे.
- दुसऱ्या दिवसाअखेरीस भारताची धावसंख्या १८३/५
- हार्दिक पांड्या – विराट कोहली जोडीने भारताची पडझड थांबवली
- मात्र पार्थिव पटेल बाद, भारताचा निम्मा संघ माघारी
- पार्थिव पटेल – विराट कोहलीकडून मोठी भागीदारी रचण्याचा प्रयत्न
- मात्र कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा माघारी, भारताचे ४ गडी माघारी
- रोहित शर्मा – विराट कोहलीकडून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न
- केशव महाराजने घेतला मुरली विजयचा बळी
- भारताची जमलेली जोडी फोडण्यात आफ्रिकेला यश, मुरली विजय माघारी
- कर्णधार विराट कोहलीचं अर्धशतक, भारताने ओलांडला शंभर धावसंख्येचा टप्पा
- दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी
- मुरली विजय – विराट कोहली जोडीने भारताचा डाव सावरला
- पाठोपाठ चोरटी धाव घेण्याच्या नादात चेतेश्वर पुजारा माघारी, भारताचे २ गडी बाद
- मॉर्ने मॉर्कलने भारताची जमलेली जोडी फोडली, लोकेश राहुल माघारी
- दुसऱ्या सत्रात भारतीय सलामीवीरांकडून भारतीय डावाची सावध सुरुवात
- दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रापर्यंत भारत बिनबाद ४
- रविचंद्रन आश्विनचे सामन्यात ४ बळी, ३ बळी घेऊन इशांतची आश्विनला उत्तम साथ
- आफ्रिकेचा अखेरचा गडी माघारी, पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या ३३५ धावा
- आफ्रिकेचा नववा गडी माघारी, डु प्लेसिसच्या ६३ धावा
- डु प्लेसिसचा त्रिफळा उडवत इशांत शर्माने आफ्रिकेची जमलेली जोडी फोडली
- तळातल्या मॉर्ने मॉर्कलकडून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न
- इशांत शर्माच्या गोलंदाजीवर पांड्याने पकडला झेल, भारताला आठवा धक्का
- अखेर कगिसो रबाडाला तंबूत माघारी धाडण्यात भारताला यश
- कर्णधार फाफ डु प्लेसीसचं अर्धशतक
- दक्षिण आफ्रिकेने ओलांडला ३०० धावांचा टप्पा
- विराट कोहली आणि हार्दिक पांड्या ने टाकला रबाडाचा झेल
- रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर कगिसो रबाडाला दोनदा जीवदान
- केशव महाराजला बाद करण्यात भारताला यश, आफ्रिकेचा सातवा गडी माघारी
- दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 14, 2018 2:53 pm