भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात संघनिवडीवरुन निर्माण झालेलं वादळ काही केल्या शमण्याचं नाव घेताना दिसतं नाहीये. चांगल्या कामगिरीच्या निकषावर रोहित शर्माला संघात जागा मिळाली असल्याचं विराट कोहलीने स्पष्ट केल्यानंतर विरेंद्र सेहवागने विराटवर चांगलाच निशाणा साधला आहे. चांगली कामगिरी हा निकष लावयचा असेल तर, सेंच्युरिअनमध्ये विराट कोहली अपयशी ठरल्यास त्याने स्वतःहून संघाच्या बाहेर पडावं. अनेक माजी खेळाडूंसह सेहवागनेही दुसऱ्या कसोटीत भारताच्या संघनिवडीवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

केप टाऊन कसोटीत भारतीय संघ व्यवस्थापनाने अजिंक्य रहाणेला संघाबाहेर करत रोहित शर्माला संघात जागा दिली. विराट कोहलीच्या या निर्णयावर अनेक माजी खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केली. अनेक माजी खेळाडूंनी भारताचा हा निर्णय संपूर्णपणे चुकीचा असल्याचं बोलून दाखवलं होतं. यानंतर सेंच्युरिअन कसोटीत भारतीय संघ व्यवस्थापनाने, अंतिम ११ जणांमध्ये अनाकलनिय बदल केले. पहिल्या कसोटीत चांगली गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला विश्रांती देऊन इशांत शर्माला संघात जागा दिली गेली. याचसोबत शिखर धवनलाही विश्रांती देऊन लोकेश राहुलला संघात सलामीवीराच्या जागी बढती देण्यात आली.

अवश्य वाचा – शिखर धवन बळीचा बकरा, दुसऱ्या कसोटीच्या संघनिवडीवर सुनिल गावसकरांची बोचरी टीका

“केवळ एका कसोटी सामन्यात अपयशी झाल्यामुळे विराटने शिखर धवनला संघाबाहेर बसवलं. भुवनेश्वर कुमारला विश्रांती देऊन इशांत शर्माला संघात जागा देण्याचा निर्णय तर समजण्याच्या पलीकडचा आहे. त्यामुळे याच निकषाच्या आधारावर सेंच्युरिअन कसोटीत विराट कोहली अपयशी ठरला तर आगामी कसोटीत त्याने स्वतःहून संघाबाहेर पडावं.” इंडिया टुडे या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विरेंद्र सेहवाग बोलत होता. दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या साहाऐवजी पार्थिव पटेलला संघात जागा देण्याचा निर्णय वगळता या कसोटीत भारताची संघ निवड पुरती फसली आहे. इशांत शर्माला संघात जागा देताना भुवनेश्वर कुमार ऐवजी शमी किंवा अन्य गोलंदाजाला संघाबाहेर करता आलं असतं, सेहवागने आपलं परखड मत मांडलं.

अवश्य वाचा – रहाणेच्या गच्छंतीसाठी आग्रही असणारी माणसं आता त्याचं समर्थन करतायत, विराटचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर

केप टाऊन कसोटीत भारताला ७२ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. यानंतर सेंच्युरिअन कसोटीच्या पहिल्या दिवशी आफ्रिकन फलंदाजांनी सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखलं. अखेर रविचंद्रन आश्विनच्या फिरकीने तिसऱ्या सत्रात आफ्रिकन फलंदाजांना धक्के दिले. याचसोबत भारतीय क्षेत्ररक्षकांच्या चपळ क्षेत्ररक्षणामुळे भारताने अखेरच्या सत्रात सामन्यात पुनरागमन केलं.