भारत विरुद्ध श्रीलंका ही मालिका आता केवळ औपचारिकता म्हणून खेळवली जात आहे का असा प्रश्न उद्भवायला लागला आहे. सलग चौथ्या सामन्यात श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीसमोर नांगी टाकली. श्रीलंकेवर १६८ धावांनी मात करुन भारताने या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली आहे. अँजलो मॅथ्यूजचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाने भारतीय गोलंदाजीचा नीट सामना केला नाही. त्यामुळे श्रीलंकेला बाद करणं ही भारतीय गोलंदाजांसाठी सोपी बाब होऊन गेली.

भारताने दिलेल्या ३७६ धावांचं आव्हान पेलताना लंकेच्या डावाची सुरुवातचं अडखळती झाली. सलामीवीर निरोशन डिकवेला शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर बाद  झाला. आपल्या पहिल्याच सामन्यात शार्दुलने आपल्या नावावर एक विकेट जमा केली. यानंतर कुशल मेंडीस चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात लोकेश राहुलच्या अचूक फेकीवर धावबाद झाला. मग जसप्रीत बुमराहने दिलशान मुनवीराला झेलबाद करत लंकेला तिसरा धक्का दिला. त्यामुळे सलग चौथ्या सामन्यातही लंकेची अवस्था बिकट झाली. यानंतर अँजलो मॅथ्यूज आणि लहिरु थिरीमने यांच्यात ३१ धावांची छोटीशी भागीदारी झाली. मात्र हार्दिक पांड्याने थिरीमनेला माघारी धाडत लंकेला चौथा धक्का दिला.

यानंतर अँजलो मॅथ्यूज आणि सिरीवर्धना यांच्यात चौथ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी झाली. या भागीदारीमुळे श्रीलंकेने सन्मानजनक धावसंख्याही उभारली. पण हार्दिक पांड्याने सिरीवर्धनेला माघारी धाडत लंकेला पाचवा धक्का दिला. दरम्यान अँजलो मॅथ्यूजने आपलं अर्धशतक साजरं केलं. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने इतर खेळाडूंची हवीतशी साथ मिळालेली नाही. यानंतर एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. श्रीलंकेच्या उरलेल्या फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचं काम करत माघारी परतणं पसंत केलं.

भारताकडून जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २-२ फलंदाजांना माघारी धाडलं. त्यांना शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल यांनी १-१ बळी घेत चांगली साथ दिली. श्रीलंकेचे दोन फलंदाज या सामन्यात धावबाद झाले.

महेंद्रसिंह धोनी आणि मनीष पांडेने अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने चौथ्या वन-डे सामन्यात श्रीलंकेसमोर ३७६ धावांचं आव्हान उभं केलं. या सामन्यात महेंद्रसिंह धोनीचं अर्धशतक अवघ्या एका धावाने हुकलं, मात्र मनीष पांडेने आपल्याला मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत अर्धशतक साजरं केलं. या दोघांमध्येही सहाव्या विकेटसाठी १०१ धावांची नाबाद भागीदारी झाली. भारताचा निम्मा संघ माघारी परतल्यानंतर श्रीलंका सामन्यात पुनरागमन करणार असं वाटत असतानाच, दोन्ही खेळाडूंनी आपल्या संघाचा डाव सावरत सामन्यावरची आपली पकड अजुनही मजबूत ठेवली.

याआधी  रोहीत शर्माने सलग दुसऱ्या सामन्यात आपलं शतक साजरं केलं. त्याने ८८ चेंडुंमध्ये ११ चौकार आणि ३ षटकारांसह १०४ धावांची खेळी केली. रोहीत शर्माच्या सोबतीने खेळणाऱ्या हार्दिक पांड्याने आक्रमक फटकेबाजी करत संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठा फटका खेळताना अँजलो मॅथ्यूजच्या गोलंदाजीवर पांड्या माघारी परतला. त्यानंतर लगेचच मॅथ्यूजने रोहीत शर्माला माघारी करत भारताला चौथा धक्का दिला. त्यापाठोपाठ लोकेश राहुललाही अकिला धनंजयने माघारी धाडत भारताला ५ वा धक्का दिला. त्यामुळे अचानक सामन्यावर पकड बसवलेल्या भारताला श्रीलंकेने बॅकफूटवर ढकललं.

भारतीय डावाची सुरुवात मात्र काहीशी अडखळती झाली. शिखर धवन माघारी परतल्यानंतर मैदानात आक्रमक खेळी करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीला माघारी धाडण्यात श्रीलंकेला यश आलं. कर्णधार लसिथ मलिंगाने कोहलीला माघारी धाडलं. विराट कोहलीने ९६ चेंडुंमध्ये १३१ धावांची आक्रमक खेळी केली. या खेळीत विराटने तब्बल १७ चौकार आणि २ षटकार लगावले आहेत. कोहलीच्या खेळामुळे श्रीलंकेविरुद्ध चौथ्या वन-डे सामन्यात भारताने सामन्यावर पकड मजबूत केली आहे.  दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी २१९ धावांची भागीदारी केली आहे. भारतीय डावाची सुरुवात काहीशी अडखळती झाली. सलामीवीर शिखर धवन अवघ्या ४ धावा काढून विश्वा फर्नांडोच्या गोलंदाजीवर मलिंदा पुष्पकुमाराच्या हाती झेल देऊन माघारी परतला.

श्रीलंकेकडून अँजलो मॅथ्यूजने २ जणांना माघारी धाडलं. तर विश्वा फर्नांडो, अकिल धनंजया आणि लसिथ मलिंगाने प्रत्येकी १-१ फलंदाजाला माघारी धाडलं. ५ सामन्यांची मालिकेत भारत आता ४-० ने आघाडीवर आहे. त्यामुळे अखेरच्या सामन्यात विजय मिळवून भारत लंकेला क्लिन स्विप देतो का हे पहावं लागणार आहे.

  • भारतीय गोलंदाजीसमोर सर्व श्रीलंकन फलंदाज ठरले हजेरीवीर, लंकेला २०७ धावांमध्ये गुंडाळण्यात भारताला यश
  • जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर मुनवीरा बाद, लंकेची अवस्था बिकट
  • पाठोपाठ चोरटी धाव घेण्याच्या नादात कुशल मेंडीस धावबाद, लंकेला दुसरा धक्का
  • श्रीलंकेच्या डावाची खराब सुरुवात, सलामीवीर निरोशन डिकवेला शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर बाद
  • भारताचं लंकेसमोर ३७६ धावांचं आव्हान
  • धोनीचं अर्धशतक एका धावेने हुकलं, मनीष पांडेचं मात्र झुंजार अर्धशतक
  • धोनी आणि मनीष पांडेची सहाव्या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी
  • अकिला धनंजयने लोकेश राहुलला माघारी धाडत भारताला पाचवा धक्का दिला
  • लागोपाठ रोहीत शर्माही मॅथ्यूजच्या गोलंदाजीवर बाद, भारताचे ४ गडी तंबूत
  • मात्र मॅथ्यूजच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना पांड्या माघारी
  • दरम्यान रोहीत शर्माचं सलग दुसऱ्या सामन्यात शतक
  • हार्दिक पांड्याला फलंदाजीच्या क्रमवारीत बढती, पांड्यानेही आक्रमक फटके खेळत धावा जमवल्या
  • मलिंगाला मोठा फटका खेळण्याच्या नादात कोहली बाद, भारताला दुसरा धक्का
  • भारताची सामन्यावर पकड, लंकेचे गोलंदाज हतबल
  • लंकेच्या गोलंदाजीवर कोहलीचा हल्लाबोल, चौथ्या सामन्यात धडाकेबाज शतक
  • दुसऱ्या बाजूने रोहीत शर्माची कोहलीला उत्तम साथ, अर्धशतक केलं साजरं
  • कर्णधार विराट कोहलीचा आक्रमक खेळ, ९ चौकारांच्या मदतीने अर्धशतक साजरं
  • भारताच्या डावाची सुरुवात अडखळती, धवनला ४ धावांवर बाद करुन फर्नांडोचा भारताला पहिला धक्का
  • भारताकडून राखीव फळीला संघात खेळण्याची संधी, मनीष पांडे, कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूरला संघात स्थान
  • नाणेफेक जिंकत भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय