कोलंबो कसोटी चौथ्या दिवशी श्रीलंकेवर एक डाव आणि ५३ धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने, श्रीलंकेविरुद्धची मालिका २-० ने आपल्या खिशात घातली आहे. कोलंबो कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केलं. तिसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात शतकवीर कुशल मेंडीसला माघारी धाडण्यात अखेर भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले होते. त्यानंतर आजच्या दिवशी सकाळच्या सत्रात दिमुथ करुणरत्ने आणि नाईट वॉचमन मलिंदा पुष्पकुमारा यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. यादरम्यान करुणरत्नेने आपलं शतकही साजरं केलं. त्याला दुसऱ्या बाजूने पुष्पकुमाराने चांगली साथ दिली, मात्र मात्र रविचंद्नन अश्विनला रिव्हर्स स्विप फटका खेळण्याच्या नादात तो माघारी परतला. पाठोपाठ रविंद्र जाडेजाने कर्णधार दिनेश चंडीमलला स्लिपमध्ये अजिंक्य रहाणेला झेल द्यायला भाग पाडत श्रीलंकेला चौथा धक्का दिला.

मात्र यानंतरही दिमुथ करुणरत्ने एका बाजूने संघाचा किल्ला लढवत होता. अखेर जडेजाच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये अजिंक्य रहाणेने झेल टिपत करुणरत्नेला माघारी धाडलं. तब्बल ३०७ चेंडुंचा सामना करत त्याने १४१ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १६ चौकारांचा समावेश होता. करुणरत्नेले अँजलो मॅथ्यूजसोबत पाचव्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. त्यामुळे हे दोन्ही फलंदाज लंकेची नौका पार करुन देणार असं वाटत असतानाच रविंद्र जाडेजाने करुणरत्नेला माघारी पाठवलं. पाठोपाठ जाडेजाच्या गोलंदाजीवर अँजलो मॅथ्यूज यष्टीरक्षक साहाकडे झेल देत माघारी परतला. त्यानंतर अवघ्या काही मिनीटात दिलरुवान पेरेरा जाडेजाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना यष्टीचित झाला. यानंतर निरोशन डिकवेला आणि धनंजय डिसिल्वा यांनी काही प्रमाणात प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण जाडेजाने डिसिल्वाला माघारी धाडत लंकेला बॅकफटूवर नेलं. यावेळी श्रीलंकेचे ८ गडी माघारी परतले होते.

यानंतर तळातल्या फलंदाजांनी भारतील गोलंदाजीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्नही केला नाही. ठराविक अंतराने धनंजय डिसिल्वा आणि नुवान प्रदीप हे माघारी परतले आणि भारताने कोलंबो कसोटीत आपला विजय निश्चीत केला. पहिल्या डावाच्या तुलनेत श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीचा नेटाने सामना केला. दिमुथ करुणरत्ने आणि कुशल मेंडीस यांनी शतकी खेळी करत श्रीलंकेचं सामन्यातं आव्हान कायम ठेवलं. मात्र अँजलो मॅथ्यूज आणि निरोशन डिकवेलाचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाने दोन्ही शतकवीरांना साथ दिली नाही.

भारताकडून दुसऱ्या डावात रविंद्र जाडेजाने ५ बळी घेत श्रीलंकेचा निम्मा संघ गारद केला. त्याला हार्दिक पांड्या आणि रविचंद्रन अश्विनने २ आणि उमेश यादवने १ बळी घेत चांगली साथ दिली. भारत आणि श्रीलंका यांच्यातली तिसरी कसोटी शनिवारी पल्लकेलेच्या मैदानावर होणार आहे. त्यामुळे या कसोटीतही विजय मिळवत मालिकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवण्याचा विराट कोहलीच्या टीम इंडियाचा मानस असणार आहे.

  • अखेर कोलंबो कसोटीत श्रीलंकेची झुंज मोडीत काढत भारताचा एक डाव आणि ५३ धावांने विजय
  • तळातल्या फलंदाजांकडून भारतीय गोलंदाजीचा प्रतिकार नाही
  • धनंजय डिसिल्वाला बाद करत जाडेजाचा लंकेला आठवा धक्का, जाडेजाचे सामन्यात ५ बळी
  • दिलरुवान पेरेरा जाडेजाच्या गोलंदाजीवर यष्टीचित, लंकेला सातवा धक्का
  • रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर शतकवीर करुणरत्ने आणि मॅथ्यूज माघारी, लंकेचे ६ गडी तंबूत
  • लंच टाईमनंतर भारताचे श्रीलंकेला धक्के
  • लंच टाईमपर्यंत श्रीलंकेची अवस्था ३०२/४
  • अँजलो मॅथ्यूज आणि दिमुथ करुणरत्नेची पुन्हा नाबाद अर्धशतकी भागीदारी, लंकेचं भारताला जोरदार प्रत्युत्तर
  • पाठोपाठ कर्णधार दिनेश चंडीमल रविंद्र जाडेच्या गोलंदाजीवर रहाणेकडे झेल देत माघारी परतला.
  • पुष्पकुमाराला बाद करत अश्विनने लंकेला तिसरा धक्का दिला.
  • तिसऱ्या विकेटसाठी करुणरत्ने आणि पुष्पकुमाराची ४० धावांची भागीदारी
  • मेंडीस पाठोपाठ दिमुथ करुणरत्नेचंही शतक, लंकेची झुंज सुरुच
  • चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात