भारताच्या ‘हिटमॅन’चं धडाकेबाज शतक आणि कर्णधार विराट कोहलीच्या झंजावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात विजय मिळवत मालिकेत २-१ ने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं २८७ धावांचं आव्हान भारताने ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. रोहित शर्माने ११९ तर कर्णधार विराट कोहलीने ८९ धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंच याने या दोघांचे तोंडभरून कौतुक केले.

भारतानं ऑस्ट्रेलियाला अक्षरश: ठेचलं – शोएब अख्तर

काय म्हणाला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच

“विराट कोहली हा सगळ्यात प्रतिभावंत खेळाडू आहे. तर रोहित शर्मा सर्वकालीन टॉप ५ फलंदाजांपैकी एक आहे. त्या दोघांची तुलना इतर कोणाशीच करता येणार नाही”, अशी स्तुती फिंचने केली.

ICC ODI Rankings : विराट, रोहितचं साम्राज्य अबाधित; जाडेजाचा दुहेरी धमाका

सध्या भारतीय संघात चांगले आणि अनुभवी खेळाडू आहेत आणि ते मोठ्या खेळी करून सामना जिंकवून देत आहेत. शिखर धवन नसताना रोहितचे शतक हे अधिक खास आहे. त्यांच्यापुढे असणारे आव्हान तसे मोठे होते. अशा वेळी नियमित सलामीवीर जोडीदार नसतानाही दमदार कामगिरी करणं हे खूपच आव्हानात्मक असते. पण ज्यांच्याकडे अव्वल ४ फलंदाज अप्रतिम असतात, त्यांना सामने जिंकणे फार कठीण नसते”, असे फिंच म्हणाला.

विराटने मोडला ‘कॅप्टन कूल’ धोनीचा विक्रम

तिसऱ्या सामन्यात कॅप्टन कोहलीने दमदार खेळीसह एक महत्त्वाचा विक्रम मोडला. त्याने केलेल्या ८९ धावांच्या कामगिरीच्या जोरावर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार ठरला. हा विक्रम आधी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावे होता. त्याच्या नावे कर्णधार म्हणून ११ हजार २०७ धावा आहेत. त्यापुढे जात विराटने ११ हजार २०८ धावा केल्या. या यादीत मोहम्मद अझरूद्दीन तिसरा तर सौरव गांगुली चौथा आहे.

शतकासह रोहितने केली विराटशी बरोबरी

भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याने नवीन वर्षात आपलं पहिलं-वहिलं शतक झळकावलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात रोहितने कांगारुंच्या गोलंदाजांचा समाचार घेत आपल्या वन-डे कारकिर्दीतल्या २९ व्या शतकाची नोंद केली. रोहितने आधी लोकेश राहुल आणि त्यानंतर विराट कोहलीसोबत महत्वपूर्ण भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे क्रिकेटमधलं रोहितचं हे आठवं शतक ठरलं. या शतकी खेळीसह रोहितने विराटशी बरोबरी केली आहे. या दोन फलंदाजां व्यतिरीक्त सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ शतकं झळकावली आहेत.