गाबा येथे ब्रिस्बेनच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चौथा कसोटी सामना सुरु आहे. मालिकेतील हा अखेरचा आणि निर्णायक कसोटी सामना आहे. मालिका जिंकण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया दोघांना या कसोटीत विजय आवश्यक आहे. भारतीय संघाची सद्य स्थिती लक्षात घेता, उपकर्णधार रोहित शर्माची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.
कारण अश्विन, जडेजा, बुमराह आणि विहारी हे प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. नियमित कर्णधार विराट कोहली सुद्धा भारतामध्ये आहे. त्यामुळे रोहितकडून संघाला भरपूर अपेक्षा आहेत. पण आज रोहित शर्मा नॅथन लायनच्या चेंडूंवर ज्या पद्धतीने बाद झाला, त्यावरुन त्याच्यावर भरपूर टीका होत आहे. संघाला गरज असताना, रोहितला असा बेजबाबदार फटका खेळण्याची गरज नव्हती, असे क्रिकेट पंडितांपासून ते सर्वसामन्य प्रेक्षक म्हणत आहेत.
संयमी खेळी करण्याची गरज असताना रोहित शर्मा लायनच्या गोलंदाजीवर क्रीजमधून पुढे आला व त्याने हवाई फटका खेळला. लायनने सीमारेषेवर लावलेल्या फिल्डरने रोहितचा सहज झेल पकडत त्याला तंबूत धाडले. रोहितने (४४) धावा केल्या.
रोहितवर चहूबाजूंनी टीका होत असताना या विषयावर तो म्हणाला की, “नॅथन लायनच्या गोलंदाजीवर मी जो फटका खेळलो, त्याबद्दल मला अजिबात खंत नाहीय.” षटकार ठोकण्याच्या नादात रोहितने आपली विकेट बहाल केली.
“मला चेंडू जिथे पोहोचवायचा होता, तिथे पोहोचवू शकलो नाही. लाँग ऑन आणि डीप स्क्वेअर-लेगच्या फिल्डरच्या मधून मला चेंडू मारायचा होता. मला ज्या पद्धतीने हा फटका खेळायला आवडतो, तसे बॅट आणि चेंडूचे कनेक्शन झाले नाही. आज जे मी केले, ते मला आवडले. इथे येण्याआधी फलंदाजीसाठी चांगली खेळपट्टी आहे, हे माहित होते” असे रोहित शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाला.
“मैदानावर जाऊन काही षटके खेळल्यानंतर चेंडू स्विंग होत नसल्याचे माझ्या लक्षात आले. माझे बाद होणे दुर्देवी आहे. पण त्या बद्दल मला खंत नाही. मैदानावर गेल्यानंतर गोलंदाजांवर दबाव टाकायला मला आवडते. गोलंदाजांवर दबाव टाकणे, ही माझी या संघातील भूमिका आहे” असे रोहित शर्मा म्हणाला.
दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात पावसानेच बॅटिंग केली. त्यामुळे पंच आणि सामनाधिकाऱ्यानं आजच्या दिवसाचा खेळ थांबवला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या असून भारतीय संघ दोन बाद ६२ धावांवर खेळत आहे. शुभमन गिल (७) तर उपकर्णधार रोहित शर्मा (४४) धावांवर बाद झाला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 16, 2021 5:17 pm