दुसऱ्या कसोटीसह निर्भेळ मालिका विजयाचे ध्येय

कोलकाता : भारतीय क्रिकेटमध्ये अखेर शुक्रवारी ‘गुलाबी क्रांती’ला प्रारंभ होणार आहे. सुरुवातीला अनिच्छा प्रकट करणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्रे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी सांभाळल्यानंतर प्रकाशझोतातील पहिला कसोटी सामना ईडन गार्डन्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवणार जात आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचे पारडे बांगलादेशपेक्षा जड आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) प्रकाशझोतातील कसोटी सामन्याला मान्यता दिल्यानंतर सात वर्षांनी गांगुलीच्या प्रयत्नांनी भारतात ‘गुलाबी क्रांती’ अवतरणार आहे. गांगुलीनेच हे शिवधनुष्य पेलताना बांगलादेश क्रिकेट मंडळाला प्रकाशझोतातील कसोटीसाठी राजी केले. अ‍ॅडलेड येथे चार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्याने प्रकाशझोतातील गुलाबी पर्वाला प्रारंभ झाला. त्यानंतर आतापर्यंत ११ प्रकाशझोतातील सामने झाले आहेत. याच मैदानावर प्रकाशझोतातील कसोटीचा प्रस्ताव गतवर्षी ऑस्ट्रेलियाने भारतापुढे ठेवला होता, परंतु भारताने तो फेटाळला होता. परंतु गांगुली अध्यक्ष झाल्यानंतर आठवडय़ाभरातच प्रकाशझोतातील कसोटीचे ऐलान त्याने केले. मग गांगुलीचा प्रस्ताव कोहलीने फक्त तीन सेकंदांत मान्य केला.

क्रिकेटमधील पारंपरिक मानल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेटचा प्रकाशझोतामधील आविष्कार पाहण्यासाठी ईडन गार्डन्सवर तिकीट विक्रीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भारतीय संघ मायदेशामधील सलग १२व्या कसोटी मालिकेच्या विजयासाठी उत्सुक आहे. हा क्रिकेटचा गुलाबी महोत्सव असेल, यासाठी बंगाल क्रिकेट संघटनेची तयारी सुरू आहे.

वेगवान त्रिकुटाचा धसका

इंदूरचा पहिला कसोटी सामना तीन दिवसांत संपवणाऱ्या मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि उमेश यादव या भारताच्या वेगवान गोलंदाजांचा धसका बांगलादेशने घेतला आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाजांनी २० पैकी १४ बळी घेतले होते. त्यामुळेच भारताला एक डाव आणि १३० धावांनी विजय मिळवता आला.

सलामीवीर लयीत

मयंक अगरवाल आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधील सलामीवीराची भूमिका आता समर्थपणे सांभाळली आहे. इंदूर कसोटी मयंकने द्विशतक साकारले आहे, तर रोहित सातत्यपूर्ण फलंदाजी करीत आहे. विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा यांची भक्कम मधली फळी भारताला ५०० धावसंख्येपर्यंत मजल मारून देण्याइतपत समर्थ आहे. चेतेश्वर पुजारालाही सूर गवसला आहे.

रहिम, जायेदवर मदार

गेले तीन देशांतर्गत दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा प्रकाशझोतात खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंनी गुलाबी चेंडूचा अनुभव घेतला आहे. परंतु बांगलादेशच्या क्रिकेटपटूंना प्रथमच या चेंडूनिशी खेळण्याचे आव्हान असेल. इंदूर कसोटी सामन्यात बांगलादेशची फलंदाजी झगडताना आढळली. फक्त मुशफिकूर रहिमला अर्धशतकी खेळी साकारता आली होती. भ्रष्टाचारप्रकरणी शाकिब अल हसनला निलंबित केल्यानंतर नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱ्या मोमिनूल हकला दडपण हाताळणे कठीण जात आहे. इंदूर कसोटीत अबू जायेदने टिच्चून गोलंदाजी केली होती. वेगवान मारा हेच बांगलादेशचे बलस्थान आहे.

संघ

* भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, हनुमा विहारी, कुलदीप यादव, शुभमन गिल.

बांगलादेश : मोमिनूल हक (कर्णधार), लिटन दास (यष्टीरक्षक), मेहिदी हसन, नयीम हसन, अल-अमिन हुसैन, ईबादत हुसैन, मोसादीक हुसैन, शदमान इस्लाम, तैजूल इस्लाम, अबू जायेद, इम्रूल कायेस, महमुदुल्ला, मोहम्मद मिथुन, मुशफिकूर रहिम, मुस्ताफिझूर रहमान.

* सामन्याची वेळ : दुपारी १ वाजल्यापासून.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी.

प्रकाशझोतातील सामन्यापूर्वी एखादा सराव सामना खेळायला मिळाला असता तर लाभदायक झाले असते. त्यामुळे आता आमच्याकडे फक्त मानसिकदृष्टय़ाच स्वत:ला तयार करण्याचा पर्याय असून भविष्यात या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिले जाईल, अशी अपेक्षा आहे.

– मोमिनूल हक, बांगलादेशचा कर्णधार

कर्णधारांनी त्यांच्या गोलंदाजांना चलाखीने वापरणे गरजेचे आहे. सूर्यप्रकाशातील सामन्यांमध्ये कर्णधार फक्त सकाळच्या सत्रात अथवा नवीन चेंडू आल्यावरच वेगवान गोलंदाजांकडे वळतात. मात्र गुलाबी चेंडूने सातत्याने एका बाजूने वेगवान गोलंदाजाची आवश्यकता भासणार असल्याने कर्णधाराचे कौशल्यही पणाला लागणार आहे.

– गौतम गंभीर, माजी क्रिकेटपटू

चाहत्यांना कसोटी पाहण्यासाठी पुन्हा स्टेडियमकडे वळवणे, हे प्रकाशझोतातील सामन्याचे मूळ लक्ष्य आहे. परंतु यामुळे खेळाचा दर्जा खालावला जाणार नाही, याकडेही लक्ष दिले पाहिजे. सायंकाळी दवामुळे जर चेंडू ओलसर झाला तर, कसोटी आणि मर्यादित षटकांच्या सामन्यात फरकच उरणार नाही. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करूनच भविष्यात प्रकाशझोतातील सामन्यांचे आयोजन केले पाहिजे.

– सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू

११ क्रिकेटच्या इतिहासातील हा ११वा प्रकाशझोतातील आंतरराष्ट्रीय कसोटी सामना असणार आहे. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक पाच प्रकाशझोतातील सामने खेळले आहेत.

१ महिलांच्या क्रिकेटमधील एकमेव प्रकाशझोतातील कसोटी सामना ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात २०१७ मध्ये झाला होता

४१ ईडन गार्डन्सवरील हा ४१वा कसोटी सामना असून येथे झालेल्या १२ सामन्यांत प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे, तर नऊ वेळा दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे.