जागतिक हॉकी लीग
जागतिक हॉकी लीग अंतिम फेरी स्पध्रेच्या उपांत्य फेरीत भारतीय पुरुष हॉकी संघ सातत्यपूर्ण कामगिरीचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून बेल्जियमविरुद्ध मैदानात उतरणार आहे. शनिवारी रायपूर येथील स्टेडियमवर हे दोन्ही संघ समोरासमोर येणार आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सचा ३-२ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे.
स्पध्रेतील पहिल्याच सामन्यात अर्जेटिनाकडून ३-० असा दारुण पराभव पत्करल्यानंतर भारताने ऑलिम्पिक विजेत्या जर्मनीला १-१ असे बरोबरीत रोखून स्पध्रेत पुनरागमन केले. मात्र पुढील सामन्यातच नेदरलँड्सने (३-१) बाजी मारून भारतीय संघाला जमिनीवर आणले. परंतु अंदाज बांधण्यास अवघड असलेल्या भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडला नमवून उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. असे असले तरी सातत्यपूर्ण खेळाच्या अभावामुळे भारताचे प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांना चिंतेत टाकले आहे.
‘‘इंग्लंडविरुद्धच्या कामगिरीची पुनरावृत्ती पुढील सामन्यातही भारताकडून होईल, याची खात्री मी देऊ शकत नाही. पण आम्ही सातत्यपूर्ण खेळ करण्यासाठी प्रयत्नशील राहू,’’ अशी ग्वाही ओल्टमन्स यांनी दिली. काही त्रुटी वगळल्यास भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध सर्वोत्तम खेळ केला. प्रत्येक विभागात यजमानांची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. आघाडीपटूंमध्ये जाणवणारा कमकुवतपणा तलविंदर सिंग व रमनदीप सिंग यांनी भरून काढला. युवा मोहम्मद अमीर खानची कामगिरीही नेत्रदीपक होती. मध्यरक्षक सरदार सिंगची कामगिरी संघासाठी प्रेरणादायी ठरली आहे. आघाडीपटू आणि बचावपटू यांच्यातील दुव्याची भूमिका मध्यरक्षक बजावत असतो. त्यामुळे सरदार, कोठाजित सिंग आणि मनप्रीत सिंग यांच्या कामगिरीवर सामन्याचा निकाल अवलंबून आहे. बचावात भारतीय संघ नेहमी अपयशी ठरतो आणि त्यामुळे संघावर दडपण निर्माण होते, परंतु इंग्लंडविरुद्ध बचावपटूंनी अप्रतिम खेळ केला.
सामन्याची वेळ :
सायंकाळी ६.३० वाजता
ल्ल थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १