England vs India 1st Test Live Updates : पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने ९ बाद २८५ धावा केल्या. जेम्स अँडरसन ९ चेंडूत ० धावांवर तर सॅम कुर्रान एकाकी झुंज देत ६७ चेंडूत २४ धावांवर खेळत आहे. कुलदीप यादवपेक्षा अधिक विश्वास दाखवलेल्या रविचंद्रन अश्विनने तो विश्वास सार्थ ठरवत ४ बळी टिपले. याशिवाय, मोहम्मद शमीने २ तर इशांत आणि उमेश यादवने १-१ बळी टिपला. इंग्लंडतर्फे कर्णधार रूटने सर्वाधिक ८० धावा केल्या. तर बेअरस्टोने ७० धावांची खेळी केली.

चहापानानंतर डावाला सुरुवात झाली. एक चांगली धावसंख्या उभारण्याच्या दिशेने इंग्लंडचा संघ खेळत असतानाच भारतीय गोलंदाजांना सूर सापडला. प्रथम उत्तम खेळ करत असलेला जो रूट ८० धावा काढून धावबाद झाला. विराटने उत्तम थ्रो करत त्याला बाद केले. त्यानंतर पाठोपाठ पाठोपाठ बेअरस्टोचा त्रिफळा उडाला. उमेश यादवने टाकलेला चेंडू त्याच्या बॅटला लागून यष्ट्यांवर आदळला. त्याने ७० धावा केल्या. मैदानावर आलेला जोस बटलर याच्याकडून संघाला अपेक्षा होत्या. मात्र अश्विनने त्याला खातेही उघडू न देता पायचीत केले.

हाच धडाका पुढे सुरु ठेवत बेन स्टोक्सला २१ धावांवर अश्विनने स्वतःच्या गोलंदाजीवर झेलबाद केले. फिरकीपटू आदिल रशीदही केवळ १८ चेंडूंत १३ धावा करून बाद झाला. पंचांनी दिलेला निर्णय न पटल्याने भारताने रिव्ह्यू घेतला. त्यात रशीदला बाद ठरवण्यात आले. पुढे लगेचच अश्विनने आपली फिरकी अद्यापही प्रभावी असल्याचे दाखवून देत डावातील चौथा बळी टिपला आणि स्टुअर्ट ब्रॉडला केवळ १ धाव करून तंबूत पाठवले. त्यानंतर अँडरसनने ९ चेंडू खेळून काढत स्वतःला नाबाद ठेवले. तर सॅम कुर्रानने एकाकी झुंज देत ६७ चेंडूत २४ धावा केल्या.

तत्पूर्वी, चहापानापर्यंत इंग्लंडने १६३ धावा केल्या आहेत. तर भारताला ३ गडी बाद करण्यात यश आले होते. उपहारानंतर १ बाद ८३ या धावसंख्येवरून जेनिंग्स (३८) आणि रूट (३१) यांनी डावाला पुढे सुरूवात केली. त्यानंतर शमीने इंग्लंडला २ धक्के दिले. पण नंतर रूट-बेअरस्टो जोडीने डाव सावरला.

या सामन्यात फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याच्या अनुभवावर कुलदीप यादवच्या ‘मिस्ट्री’पेक्षा अधिक विश्वास ठेवण्यात आला आहे. त्याप्रमाणे तो विश्वास सार्थ ठरवण्यात आतापर्यंत अश्विन यशस्वी झाला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्याआधी, आज सामना सुरु झाल्यावर अनुभवी अलिस्टर कुक आणि किटन जेनिग्स हे दोन डावखुरे फलंदाज मैदानावर आले. उमेश यादव आणि इशांत शर्मा या वेगवान गोलंदाजाच्या जोडगोळीने त्यांच्यावर भेदक मारा करण्यास सुरुवात केली. मात्र काही काळाने त्यांच्या गोलंदाजीला फटके मारण्यास फलंदाजांनी सुरुवात केली. त्यामुळे मग अनुभवी अश्विनला पाचारण करण्यात आले. आणि आपल्या नावाला आणि अनुभवाला साजेशी गोलंदाजी करत त्याने अलिस्टर कुकला त्रिफळाचित केले. कुक १३ धावांवर तंबूत परतला. त्यांनतर भारताने एकीकडे फिरकी आणि दुसरीकडे वेगवान गोलंदाज असे आक्रमण सुरु ठेवले. पण जेनिंग्स आणि रूट दोघांनी खेळपट्टीवर पाय रोवले. त्यामुळे उपहारापर्यंत इंग्लंडने २८ षटकांत १ बाद ८३ अशी धावसंख्या उभारली होती.

दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व जो रूट याच्याकडे आहे. तर विराट कोहली भारताचे नेतृत्व करत आहे. भारताच्या संघात आज संयमी चेतेश्वर पुजाराला संघातून वगळण्यात आले आहे.