England vs India 3rd Test Live Updates : भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटीत आज पहिल्या दिवसअखेर भारताने ६ बाद ३०७ धावांपर्यंत मजल मारली. भारताचे पहिले तीन बळी लवकर बाद झाले. पण विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या जोडीने इंग्लिश गोलंदाजांची पुरेपूर धुलाई केली. विराटने ९७ तर अजिंक्यने ८१ धावा काढत भारताला मजबूत स्थितीत आणले. इंग्लंडकडून पहिल्या दिवशी ख्रिस वोक्सने ३, तर जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रत्येकी १-१ बळी टिपला. सध्या मैदानावर नवोदित ऋषभ पंत २२ धावांवर खेळत आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडच्या संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने चहापानापर्यंत भारताने ३ बाद १८९ धावा केल्या होत्या. दुसऱ्या पूर्ण सत्रात भारताने एकही गडी न गमावता १०७ धावा केल्या. भारताकडून कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी दिडशतकी भागीदारी करत भारताला सुस्थितीत आणले. दोघांनीही आपली अर्धशतके पूर्ण केली. त्यानंतर अजिंक्यने खेळाचा वेग वाढवला. ८१ धावांवर खेळत असताना अजिंक्य बाद झाला. जमलेली जोडी फोडण्यात स्टुअर्ट ब्रॉडला आले. अॅलिस्टर कुकने स्लिपमध्ये त्याचा अत्यंत उत्तम झेल टिपला. त्यानंतर विराट आपले शतक साजरे करेल. अशी अपेक्षा होती. मात्र तो फिरकीपटू अदिल रशीदच्या चेंडूवर बाद झाला. त्याने ९७ धावा केल्या. त्यांनतर हार्दिक पांड्या १८ धावांवर बाद झाला आणि त्याबरोबरच दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.

तत्पूर्वी भारताने उपहारापर्यंत ३ बाद ८२ अशी मजल मारली होती. पहिल्या सत्रात लोकेश राहुल आणि शिखर धवन या सलामीवीरांनी अर्धशतकी भागीदारी केली. पण त्यानंतर लगेचच शिखर धवन ३५ धावांवर तर लोकेश राहुलदेखील २३ धावांवर बाद झाला. काही वेळ खेळपट्टीवर तग धरल्यानंतर मोठा फटका मारण्याच्या नादात चेतेश्वर पुजाराही १४ धावांवर बाद झाला. हे तीनही बळी वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स याने टिपले.

दरम्यान, इंग्लंडच्या संघात बेन स्टोक्सला सॅम कुरानच्या जागी संधी देण्यात आली आहे. तर भारताच्या संघात सलामीवीर शिखर धवन, यष्टीरक्षक रिषभ पंत आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा यांना स्थान देण्यात आले आहे. मुरली विजय, दिनेश कार्तिक आणि कुलदीप यादव यांना संघातून वगळण्यात आले आहे. पहिल्या दोन कसोटीत पराभव स्विकारावा लागल्यानंतर तिसऱ्या कसोटीआधी भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याच्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे त्याच्या जागी संघात ऋषभ पंत याला संधी देण्यात आली आहे.

भारतीय कर्णधार विराट कोहली नवोदित ऋषभ पंत याला कसोटी कॅप प्रदान करताना…

Live Blog

23:00 (IST)18 Aug 2018
हार्दिक पांड्या झेलबाद, भारताला सहावा धक्का

हार्दिक पांड्या अँडरसन याच्या गोलंदाजीवर बाद झाला. बाहेर जाणाऱ्या चेंडूवर त्याने बॅट लावत झेल दिला. त्याने १८ धावा केल्या. या बरोबरच दिवसाचा खेळ संपवण्यात आला

22:16 (IST)18 Aug 2018
कर्णधार विराट कोहली तंबूत, ३ धावांनी हुकले शतक

भारतीय कर्णधार विराट कोहली याने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. मात्र ९७ धावांवर तो बाद झाला. आदिल रशीदने त्याला स्लिपमध्ये झेलबाद केले.

21:27 (IST)18 Aug 2018
जमलेली जोडी ब्रॉडने फोडली, अजिंक्य ८१ धावांवर बाद

१५०हून अधिक धावांची भागीदारी फोडण्यात स्टुअर्ट ब्रॉडला यश आले. अजिंक्य रहाणे ८१ धावांवर बाद झाला. अलिस्टर कुक याने स्लिपमध्ये त्याचा अत्यंत उत्तम झेल टिपला.

19:57 (IST)18 Aug 2018
विराट-अजिंक्यची अर्धशतके, भारताचा डाव सुस्थितीत

उपहारानंतर अजिंक्य आणि विराटने भारताचा डाव सावरला. दोघांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली असून भारताचा डाव सुस्थितीत आहे.

18:42 (IST)18 Aug 2018
भारत शंभरीपार, विराट-अजिंक्य मैदानावर

उपहारानंतर भारताचे अनुभवी फलंदाज कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी भारताला शंभरी गाठून दिली.

17:47 (IST)18 Aug 2018
पुजारा बाद, उपहारापर्यंत भारत ३ बाद ८२

मोठा फटका खेळण्याचा नादात चेतेश्वर पुजारा बाद झाला. क्रिस वोक्सने तिसरा बळी टिपला. त्यामुळे भारताची अवस्था उपहारापर्यंत ३ बाद ८२ अशी झाली आहे.

17:08 (IST)18 Aug 2018
लोकेश राहुल पायचीत, भारताला दुसरा धक्का

धवन पाठोपाठ लोकेश राहुल देखील बाद झाला. दोनही सलामीवीरांना क्रिस वोक्सने तंबूत धाडले. राहुलला पायचीत बाद दिल्यानंतर भारताने रिव्ह्यूचा पर्याय निवडला, पण तो रिव्ह्यू फुकट गेला.

16:56 (IST)18 Aug 2018
अर्धशतकी भागीदारीनंतर भारताला पहिला धक्का, शिखर धवन माघारी

भारतीय संघाने अर्धशतकी भागीदारी केल्यांनतर लगेच भारताचा सलामीवीर शिखर धवन बाद झाला. क्रिस वोक्स याने त्याला स्लिपमध्ये झेलबाद होण्यास भाग काढले.

16:51 (IST)18 Aug 2018
भारताची संयमी सुरूवात, धवन-राहुल जोडीची अर्धशतकी भागीदारी

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने अर्धशतकी भागीदारी केली आहे. शिखर धवन आणि लोकेश राहुल दोघेही सावधपणे खेळत असून खेळपट्टीवर स्थिरावत आहेत.