News Flash

IND vs ENG: चित्तथरारक सामन्यात भारताची इंग्लंडवर मात, मालिकाही जिंकली

सॅम करनची झुंज ठरली अपयशी

जागतिक क्रमवारीत आघाडीच्या दोन संघांत समावेश असलेल्या भारत-इंग्लंड यांच्यात आज एकदिवसीय मालिकेचा तिसरा आणि निर्णायक सामना खेळवला गेला. यात भारताने इंग्लंडला 7 धावांनी नमवत मालिका 2-1 अशी नावावर केली. नाणेफेक गमावलेल्या भारताने  प्रथम फलंदाजी करताना शिखर धवन, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांच्या अर्धशतकी योगदानामुळे इंग्लंडसमोर 330 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने 322 धावांपर्यंत मजल मारली. सुरुवातीची फळी ढासळल्यानंतर सॅम करन भारतासमोर उभा राहिला. त्याने नाबाद 95 धावा करत टीम इंडियाचे टेंशन वाढवले, मात्र, संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या षटकात 14 धावांची गरज होती. मात्र, यॉर्कर स्पेशालिस्ट टी. नटराजनने या षटकात अवघ्या 6 धावा दिल्या.

इंग्लंडचा डाव –

पुण्याच्या गहुंजे मैदानावर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात भारताच्या तीनशेपार आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. भुवनेश्वर कुमारने जेसन रॉयला 14 धावांवर तंबूत धाडले. त्यानंतर मागील सामन्यात शतकी खेळी केलेल्या जॉनी बेअरस्टोला वैयक्तिक एका धावेवर पायचित पकडले. त्यानंतर इंग्लंडला डेव्हिड मलान आणि बेन स्टोक्सकडून चांगल्या भागीदारीची अपेक्षा होती. मात्र, नटराजनच्या गोलंदाजीवर स्टोक्स झेलबाद झाला. त्याने 35 धावा केल्या. स्टोक्सनंतर आलेला बटलरही काही खास कामगिरी करू शकला नाही. शार्दुल ठाकूरने त्याला वैयक्तिक 15 धावांवर पायचित पकडले.

चार फलंदाज अपयशी ठरल्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन आणि  डेव्हिड मलान यांनी संघाला सावरले. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला दीडशेपार नेले. वैयक्तिक 36 धावांवर असताना शार्दुलने लिव्हिंगस्टोनला बाद करत इंग्लंडला संकटात टाकले. दहा धावांच्या अंतरानंतर डेव्हिड मलान अर्धशतक करून बाद झाला. आपल्या खेळीत 6 चौकार  लगावणारा मलान शार्दुलचा तिसरा बळी ठरला. त्यानंतर आलेल्या मोईन अलीने थोडा प्रतिकार केला. मात्र, भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर त्याचा पंड्याने अप्रतिम झेल टिपला. मोईन अलीने  29 धावांचे योगदान दिले. त्यानंतर सॅम करन  आणि आदिल रशिद  भारताचा अडथळा ठरले. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचत टीम इंडियाचा तणाव वाढवला. त्यानंतर विराटने शार्दुलकडे पुन्हा चेंडू दिला. शार्दुलनेही विराटचा विश्वास सार्थ ठरवत आदिल रशिदला बाद केले. विराटने रशिदचा ऑफ साईडला अफलातून झेल टिपला. त्यानंतर करनने झुंजार आणि एकदिवसीय कारकिर्दीचे पहिले अर्धशतक पूर्ण केले. त्याने मार्क वूडला साथीला घेत नवव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी रचली. इंग्लंडला दोन षटकात 19 धावांची गरज होती. 49व्या षटकात हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर भारताने दोन झेल सोडले. शेवटच्या षटकात इंग्लंडला 14 धावांची गरज होती. नटराजनने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर दुसरी धाव घेताना मार्क वूड धावबाद झाला. नटराजनने या षटकात अवघ्या 6 धावा देत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताकडून शार्दुल ठाकूरने 4, भुवनेश्वर कुमारने 3 तर, नटराजनने 1 बळी घेतला.

भारताचा डाव –

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी मागच्या सामन्यातील फॉर्म कायम राखत टीम इंडियासाठी शतकी सलामी दिली. पहिल्या दहा षटकात टीम इंडियाने बिनबाद 65 धावा फलकावर लावल्या. त्यानंतर धवनने आक्रमक फटकेबाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. 14.1 षटकात या दोघांनी भारताचे शतक साकारले. दोघे संघासाठी मोठी भागीदारी रचणार असे वाटत असताना आदिल रशीदने रोहितला बाद केले. रोहित 37 धावांचे योगदान देऊन माघारी परतला. रोहित बाद झाल्यानंतर शिखर धवनही जास्त वेळ टिकला नाही. रशिदने त्याला आपल्या गोलंदाजीवर झेलबाद केले. धवनने 10 चौकारांसह 67 धावा केल्या. मागील काही सामन्यांपासून उत्तम फॉर्मात असलेल्या विराट कोहलीला आज आपली जादू दाखवता आली नाही. मोईन अलीच्या गोलंदाजीवर तो वैयक्तिक 7 धावांवर बाद झाला. मागील सामन्यात शतक ठोकलेल्या लोकेश राहुललाही या सामन्यात चांगले प्रदर्शन करता आले नाही. तोही मोईन अलीच्या गोलंदाजीवर वैयक्तिक 7 धावांवर माघारी परतला.

मधल्या फळीतील पडझडीनंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याने भारताचा डाव सांभाळला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला दोनशेपार पोहोचवले. या दरम्यान पंतने आपला फॉर्म कायम राखत अर्धशतक झळकावले. आक्रमक पंत डोकेदुखी ठरणार असताना सॅम करनने त्याचा काटा काढला. पंतने 5 चौकार आणि 4 षटकारांसह 78 धावा केल्या. पंड्या-पंत या दोघांनी 99 धावांची भागीदारी रचत संघाला सांभाळले. त्यानंतर  हार्दिकनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर हार्दिकची बेन स्टोक्सने दांडी गुल केली. हार्दिकने 5 चौकार आणि 4 षटकारांसह 64 धावांची खेळी केली. त्यानंतर मुंबईकर शार्दुल ठाकूरने 3 षटकार आणि एका चौकारासह झटपट 30 धावांची खेळी केली. शार्दुलंनतर कृणालही 25 धावांचे योगदान देऊन बाद झाला. मार्क वूडने या दोघांना बाद केले. त्यानंतर भारताचे शेपटाकडचे फलंदाज जास्त तग धरू शकले नाहीत. रीस टॉप्लेने भूवनेश्वर कुमारला बाद करत भारताचा डाव 48.2 षटकात 329 धावांवर संपुष्टात आणला.

संघ –

इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम करन, लिआम लिव्हिंगस्टोन, आदिल रशिद, रीसी टॉप्ले, मार्क वूड,  डेव्हिड मलान.

 भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, थंगरासू नटराजन, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध  कृष्णा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 1:01 pm

Web Title: india vs england third odi match report adn 96
टॅग : India Vs England
Next Stories
1 क्रिकेटपटू मिताली राजने मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार; म्हणाली, ‘हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण’
2 सचिन तेंडुलकर पाठोपाठ युसूफ पठाणही करोना पॉझिटिव्ह
3 भारत-इंग्लंड क्रिकेट मालिका : भारताची मालिकाविजयाची धुळवड?
Just Now!
X